Jatin Paranjape on Gautam gambhir : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याची क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर सध्या बीसीसीआयकडे प्रशिक्षण कर्मचारी म्हणून तैनात असलेल्या पथकात काही नव्या सहकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली. या मागणीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या जतीन परांजपे यांनी आक्षेप घेतला आहे. बीसीसीआयने आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून न काढता त्यांना तसेच ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच पथकाने भारताला बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात सहकार्य केले होते, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर प्रशिक्षक कर्मचारी जसे की, विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचाही प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर इतर प्रशिक्षक कर्माचाऱ्यांचे काय होणार? याबाबतची चर्चा सुरू झाली होती.

हे वाचा >> BCCIचा गौतम गंभीरला धक्का, प्रशिक्षक म्हणून निवडलेल्या कोचिंग स्टाफला बोर्डाने दिला नकार

मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गौतम गंभीरने प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये बदल सुचविले आहेत. यासाठी त्याने बीसीसीआयकडे काही नावेही दिली असल्याची माहिती मिळत आहे. गंभीरने नेदरलँड्सचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडी रायन टेन डुश्काटा, अभिषेक नायर, वियन कुमार आणि मोर्ने मॉर्केल यांची नावे दिल्याचे कळते.

द्रविड जाऊन आता गौतम गंभीरकडे २०२७ पर्यंत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहील.

सध्याच्या कर्मचाऱ्यांची काय चूक आहे?

गौतम गंभीरच्या कर्मचारी बदलण्याच्या मागणीवर भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे यांनी फ्री प्रेस जर्नलशी संवाद साधला. ते म्हणाले, फुटबॉल सारख्या खेळात कोचिंगमध्ये प्रशक्षिक स्वतःची टीम तयार करतात, हे पाहण्यात आले आहे. पण भारतात सध्या असलेला कर्मचारी बदलण्याचे कारण कळत नाही. याच कर्मचारी वर्गाने भारतीय संघाला मागच्या वर्षी कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी मदत केली. तसेच यावर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

हे ही वाचा >> रोखठोक, स्पष्टवक्ता गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणार? प्रशिक्षकपदाचा अनुभव नसतानाही नियुक्तीमागे काय कारणे?

जतीन परांजपे पुढे म्हणाले, शेवटी गौतम गंभीरला जे सोयीचे वाटेल, त्याबाबत तो निर्णय घेण्यास मोकळा आहे. पण ज्या प्रशिक्षक टीमने भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करण्यास सहकार्य केले आहे, त्यांना घालवून नवे सहकारी आणण्यात काय हशील होणार आहे?

जतीन परांजपे यांची मागणी काय?

जतीन परांजपे म्हणाले की, सर्वाच्या सर्व प्रशिक्षक टीमला एकाच वेळी बदलणे, ही काही चांगली बाब ठरणार नाही. पारस म्हांब्रे आणि विक्रम राठोड यांनी भारतीय संघाला आयसीसीच्या तीनही विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत धडक मारण्यात सहकार्य केले होते. बीसीसीआयने सध्याच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना कायम ठेवून गौतम गंभीर त्यांच्याशी कसे जुळवून घेतोय, हे पाहायला हवे.

“फक्त बदल करायचा आहे म्हणून बदल करणे, हे न पटणारे आणि अयोग्य आहे. केकेआरबरोबर असलेला प्रशिक्षक कर्मचारी वर्ग हा केवळ एका वर्षांपासून त्याच्याबरोबर आहे, हेही विसरून चालणार नाही. केकेआरशी ते दहा वर्षांपासून जोडलेले आहेत, असेही नाही. त्यामुळे बीसीसीआयने याचा सखोल विचार करावा, अशीही मागणी परांजपे यांनी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cac member jatin paranjape angry on gautam gambhir demands for new coaching staff for team india kvg