Cameron Green is doubtful to play in the Test series against India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, ज्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणूनही ओळखले जाते. भारतीय संघाने २०१४/१५ पासून, सलग चार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकल्या आहेत. यावेळीही भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. आता या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन दुखापतग्रस्त झाला असून त्याचे भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणे साशंक आहे.
कॅमेरून ग्रीनच्या पाठीला दुखापत –
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू असताना कॅमेरून ग्रीन जखमी झाला. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, दुखापतीमुळे तो सध्याच्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्याने या मालिकेतील पहिला आणि तिसरा एकदिवसीय सामना खेळला. तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यातून बाहेर आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील तिसऱ्या सामन्यानंतर ग्रीनने वेदना होत असल्याचे सांगितले, जिथे त्याने ४५ धावा केल्या आणि सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. प्राथमिक स्कॅनमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. अष्टपैलू खेळाडू पर्थला परतल्यावर दुखापतीची संपूर्ण तीव्रता कळेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा आतापर्यंत निराशाजनक राहिला आहे. नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, रिले मेरेडिथ आणि बेन ड्वारशुइसनंतर ग्रीन हा जखमी झालेला पाचवा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाविरुद्ध नोव्हेंबरमध्ये कसोटी मालिका खेळायची असली, तरी त्याआधी ग्रीनच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता नक्कीच वाढली आहे. तो उत्कृष्ट फलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी २८ कसोटी सामन्यांमध्ये १३७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ३५ विकेट्सही घेतल्या आहेत.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल –
नोव्हेंबरमध्ये होणारी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या दोन संघांमध्ये शेवटच्या चक्रातील अंतिम सामना झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. डब्ल्यूटीसी २०२३-२५ च्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत १० पैकी ७ सामने जिंकले आहेत, त्यापैकी दोन सामने गमावले आहेत. भारताची विजयाची टक्केवारी ७१.६७ आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तो आतापर्यंत १२ सामने खेळला आहे, ज्यापैकी त्याने ८ जिंकले आहेत आणि फक्त तीन गमावले आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी ६२.५० आहे.