आफ्रिका गटातून आयव्हरी कोस्ट आणि कॅमेरून या संघांनी पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याची किमया करून दाखवली आहे. मात्र इजिप्तला फुटबॉलच्या या महासोहळ्यात स्थान मिळवण्यासाठी घानाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात जादुई कामगिरी करावी लागणार आहे.
जीन मकोऊन याने दुसऱ्या सत्रात केलेल्या दोन गोलमुळे कॅमेरूनने टय़ुनिशियाचा ४-१ असा सहज पराभव करत सातव्यांदा फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याचा मान पटकावला. पहिल्या टप्प्यात गोलशून्य परिस्थितीत सामना सुटल्यानंतर कॅमेरूनने रविवारी चांगली कामगिरी करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. तिसऱ्या मिनिटालाच पिएरे वेबो याने गोल करत कॅमेरूनचे खाते खोलले. बेंजामिन मौकांडजो याने अध्र्या तासात दुसरा गोल करत कॅमेरूनची आघाडी मजबूत केली. दुसऱ्या सत्रात जीन मकोऊनचे दोन गोल कॅमेरूनच्या विजयात मोलाचे ठरले.
पहिल्या टप्प्यातील लढत ३-१ अशी जिंकल्यामुळे दुसऱ्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधूनही आयव्हरी कोस्टने सेनेगलचे आव्हान ४-२ असे परतवून लावत फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. मौसा साऊ याने ७७व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत सेनेगलला आघाडी मिळवून दिली. मात्र सलोमन कलोऊ याने अखेरच्या क्षणी गोल करत हा सामना बरोबरीत सोडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cameroon beats tunisia to qualify for world cup