फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, पाच वेळा चॅम्पियन ब्राझीलला त्यांच्या शेवटच्या गट-स्टेज सामन्यात कॅमेरून विरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला. कॅमेरूनच्या विजयाचा नायक व्हिन्सेंट अबुबाकर होता, ज्याने स्टॉपेज टाइमच्या काही मिनिटे आधी सामन्यातील एकमेव गोल केला. विश्वचषकाच्या इतिहासात ब्राझीलला हरवणारा कॅमेरून हा पहिला आफ्रिकन देश ठरला. मात्र, या विजयानंतरही कॅमेरूनचा संघ पुढील फेरी गाठू शकला नाही.
ब्राझील आधीच प्री-क्वार्टर फेरीत पोहोचला आहे, अशा परिस्थितीत त्याने या सामन्यात बेंच स्ट्रेंथला आजमावले. जे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होते. ब्राझीलने २४ वर्षांनंतर ग्रुप स्टेजमध्ये पहिला सामना गमावला आहे. यापूर्वी १९८८ च्या विश्वचषकात त्यांना नॉर्वेविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. प्री-क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलचा सामना आता दक्षिण कोरियाशी होणार आहे.
तसं पाहिलं तर, सध्याच्या विश्वचषकात एखाद्या संघाला उलटफेर परिस्थितींना बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्राझीलपूर्वी अर्जेंटिना, जर्मनी, बेल्जियम, स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स या संघांना या विश्वचषकात उलटफेरच्या झळा बसल्या आहेत. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले बेल्जियम आणि चार वेळचा चॅम्पियन जर्मनी हे दोन्ही संघ उलटफेर स्थितीमुळे ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले.
स्वित्झर्लंडही पुढच्या फेरीत –
दुसरीकडे, ग्रुप-जीच्या आणखी एका सामन्यात स्वित्झर्लंडने सर्बियाचा ३-२ असा पराभव करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्वित्झर्लंडकडून शेरदान शकिरी (२०व्या मिनिट), ब्रिएल एम्बोलो (४४व्या मिनिट) आणि रेमो फ्र्युलर (४८व्या मिनिट) यांनी गोल केले. दुसरीकडे, सर्बियासाठी अलेक्झांडर मिट्रोविचने २६व्या मिनिटाला आणि दुसान व्लान्होविचने ३५व्या मिनिटाला गोल केला.
हेही वाचा – FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
कॅमेरूनविरुद्धच्या पराभवानंतरही, ब्राझीलने त्यांच्या गट-जीमध्ये ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. स्वित्झर्लंडचेही सहा गुण होते. पण ब्राझीलविरुद्धच्या गोल फरकामुळे दुसरे स्थान मिळाले. कॅमेरूनचा संघ चार गुणांसह तिसऱ्या तर सर्बिया एका गुणासह चौथ्या स्थानावर राहिला.