न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंडिया ए संघ आधीच बांगलादेशला पोहोचला असून बांगलादेश ए संघासोबत चार दिवसीय सामन्यांची दोन अनाधिकृत कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेशच्या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे संघात पुनरागमन करत आहेत.
संघाचा समतोल साधत सर्व खेळाडूंना समान संधी देणे या मालिकेत सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. विराट कोहली परतल्याने तिसऱ्या क्रमांकावर तो खेळणार हे नक्की आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामी जोडीचा मुख्य पर्याय असल्याने केएल राहुलला संघात चौथ्या स्थानावर खेळावे लागू शकते. असे जर झाले तर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत कोणत्या क्रमांकावर खेळणार हा प्रश्न उद्भवतो.
भारताचे माजी निवडसमिती सदस्य सबा करीम सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने आयोजित केलेल्या संवादात म्हणाले, “मी राहुलकडे केवळ धवन आणि रोहितऐवजी सलामीचा पर्याय म्हणून पाहतो. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. तो फॉर्ममध्ये येऊन कधी खेळू शकतो हे काळच ठरवेल. तो नक्की कोणत्या क्रमांकावर खेळू शकतो हे मला माहीत नाही. सलामीवीर म्हणून नसल्यास, त्याला मधल्या फळीत वापरता येऊ शकते का? तर ते तितकेसे सोपे नाही मदल्या फळीत खेळण्यासाठी बरेच खेळाडू त्याचे स्पर्धक आहेत. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने हे शक्य तितक्या लवकर निकाली काढणे आवश्यक आहे.”
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाविषयी बोलताना ते पुढे म्हणतात, “तिघांनाही (श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत) एकत्र खेळवणे कठीण वाटते. जेव्हा तुमच्याकडे विराट कोहली संघात पुनरागमन करेल. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मग समजा तुम्ही श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर ठेवले तर तुमच्याकडे केवळ दोन स्पॉट्स उरतात. भारताला आता त्यांच्या पहिल्या सहा क्रमांकापैकी पैकी सहाव्या क्रमांकावर अष्टपैलूचा पर्याय शोधायचा आहे. जर असे असेल तर आणखी एका मधल्या फळीतील फलंदाजाला फार कमी जागा उरते. मी अय्यरकडे बघेन कारण तो न्यूझीलंड मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत शिल्लक आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे सहाव्या क्रमांकावर गोलंदाजीचा आणखी एक पर्याय असणे आवश्यक आहे.”
शिखर धवनविषयी बोलताना ते म्हणतात, “शिखर धवनसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल. मला आशा आहे की कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी नसल्याने, तो चांगला खेळ करेल. त्याने आणि रोहित शर्माने इतर फलंदाजांसाठी एक अप्रतिम व्यासपीठ तयार केले आहे. कोणीही हे विसरू नये. आयसीसी टूर्नामेंटमध्ये, धवनने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हे एक कारण आहे की मला वाटते की संघ व्यवस्थापन अजूनही त्याला एक संधी देत आहे.मला आशा आहे की, रोहितसोबत तो चांगला खेळ करेल.”