टोरंटो : भारताच्या डी. गुकेशने रशियाच्या इयान नेपोम्नियाशीविरुद्ध बरोबरीची नोंद करताना ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीअंती संयुक्त आघाडी कायम राखली. दहाव्या फेरीत दोन भारतीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या लढतीत नाशिककर विदित गुजराथीने काळया मोहऱ्यांनी खेळताना आर. प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले. खुल्या विभागातील अन्य दोन लढतींत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा विजयी ठरले.
आता अखेरच्या चार फेऱ्या शिल्लक असताना ‘कॅन्डिडेट्स’मध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. संयुक्त आघाडीवर असणाऱ्या गुकेश आणि नेपोम्नियाशी यांचे समान सहा गुण आहेत. प्रज्ञानंद, कारुआना आणि नाकामुरा त्यांच्यापेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहेत. विदित पाच गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. फ्रान्सचा अलिरेझा फिरुझा ३.५ गुणांसह सातव्या, तर अझरबैजानचा निजात अबासोव तीन गुणांसह आठव्या स्थानी आहे. ११व्या फेरीपूर्वी विश्रांतीचा दिवस आहे.
हेही वाचा >>> माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
दहाव्या फेरीत नाकामुराने अबासोवला, तर कारुआनाने फिरुझाला पराभूत केले. या फेरीतील सर्वांचे लक्ष लागलेली गुकेश आणि नेपोम्नियाशी यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. नेपोम्नियाशी यंदाच्या स्पर्धेत अपराजित असला, तरी त्याचा खेळ गुकेशइतका बहरलेला नाही. गुकेशविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळतानाही त्याने धोका पत्करणे टाळले. रुइ लोपेझ पद्धतीने सुरुवात केल्यानंतर नेपोम्नियाशी पटावर भक्कम स्थितीत होता. मात्र, गुकेशने चांगल्या चाली रचत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या टप्प्यात दोन्ही खेळाडूंनी हत्तींची आणि काही प्याद्यांची अदलाबदल केली. मात्र, दोघांनाही विजयाची संधी दिसत नसल्याने ४० चालींअंती त्यांनी बरोबरी मान्य केली.
प्रज्ञानंदने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दुसऱ्या फेरीतील गुकेशविरुद्धचा पराभव वगळता तो कोणत्याही लढतीत फारसा अडचणीत सापडलेला नाही. दहाव्या फेरीत १८ वर्षीय प्रज्ञानंदला विदितने वापरलेल्या बर्लिन बचावाचा सामना करावा लागला. तीन प्यादी आणि वजीर टिपल्यानंतर अखेरच्या टप्प्यात दोन्ही भारतीयांना जिंकण्याची फारशी संधी नव्हती. त्यामुळे ३९ चालींअंती त्यांनी बरोबरीवर समाधान मानण्याचा निर्णय घेतला.
महिला विभागात, पहिल्या नऊ फेऱ्यांत अपराजित राहिलेल्या रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाला दहाव्या फेरीत चीनच्या ले टिंगजीकडून हार पत्करावी लागली. सलग चार पराभवांनंतर भारताच्या आर. वैशालीने चांगले पुनरागमन करताना बल्गेरियाच्या नुरग्युल सलिमोवावर ८८ चालींत मात केली. भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने गुणतालिकेत संयुक्त आघाडीवर असलेल्या चीनच्या टॅन झोंगीला बरोबरीत रोखले, तर रशियाची कॅटेरिना लायनो आणि युक्रेनची अॅना मुझिचुक यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली.
दहाव्या फेरीच्या निकालांनंतर महिलांमध्ये चीनच्या झोंगी आणि टिंगजी प्रत्येकी ६.५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत. संयुक्त दुसऱ्या स्थानी असलेल्या गोर्याचकिना आणि लायनो यांचे समान ५.५ गुण आहेत. हम्पी ४.५ गुणांसह पाचव्या, सलिमोवा आणि मुझिचुक समान ४ गुणांसह संयुक्त सहाव्या, तर वैशाली ३.५ गुणांसह आठव्या स्थानी आहे.
दहाव्या फेरीचे निकाल :
* खुला विभाग
इयान नेपोम्नियाशी (एकूण ६ गुण) बरोबरी वि. डी. गुकेश (६), आर. प्रज्ञानंद (५.५) बरोबरी वि. विदित गुजराथी (५), हिकारू नाकामुरा (५.५) विजयी वि. निजात अबासोव (३), फॅबियानो कारुआना (५.५) विजयी वि. अलिरेझा फिरुझा (३.५).
* महिला विभाग
नुरग्युल सलिमोवा (एकूण ४ गुण) पराभूत वि. आर. वैशाली (३.५), टॅन झोंगी (६.५) बरोबरी वि. कोनेरू हम्पी (४.५), अलेक्झांड्रा गोर्याचकिना (५.५) पराभूत वि. ले टिंगजी (६.५), कॅटेरिया लायनो (५.५) बरोबरी वि. अॅना मुझिचुक (४).
प्रतिष्ठेची ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा दिवसेंदिवस रंजक आणि उत्कंठावर्धक होत चालली आहेत. दहाव्या फेरीअखेर गुकेश आणि नेपोम्नियाशी सहा गुणांसह आघाडीवर असले, तरी कारुआना, नाकामुरा आणि प्रज्ञानंद (प्रत्येकी ५.५) हे त्रिकूट त्यांच्यापेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे. विदित केवळ अर्ध्या गुणाने या त्रिकुटाच्या मागे आहे. दोन आघाडीवीरांच्या लढतीत नेपोम्नियाशीने पांढऱ्या मोहऱ्यांकडून आक्रमक खेळ केलाच नाही आणि गुकेशने सहज बरोबरी साधली. ‘मी काय करणार? काळया मोहऱ्यांकडून जेवढा काही प्रयत्न करायचा तो मी केला,’ असे लढतीअंती गुकेश म्हणाला. थोडक्यात नेपोम्नियाशीला गुकेशविरुद्ध जराही धोका पत्करायचा नव्हता. आता एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नेपोम्नियाशीची गाठ धमाकेदार खेळ करणाऱ्या विदितशी पडणार आहे. अग्रमानांकित कारुआनाने फिरुझाच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेत त्याला नमवले, तर नाकामुराला मात्र वेळेच्या दडपणाचा सामना करावा लागला. नाकामुराला अखेरच्या ११ चाली खेळण्यासाठी केवळ नऊ मिनिटे शिल्लक होती. मात्र, जलदगती खेळांचा राजा समजला जाणाऱ्या नाकामुराने हे आव्हान सहजपणे स्वीकारून विजय मिळवला. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक