वृत्तसंस्था, टोरंटो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशला ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाकडून पराभव पत्करावा लागला. यासह त्याने गुणतालिकेतील संयुक्त अग्रस्थानही गमावले. त्याच वेळी इयान नेपोम्नियाशीने तुल्यबळ हिकारू नाकामुराला बरोबरीत रोखत एकूण ४.५ गुणांसह आघाडी मिळवली. खुल्या विभागातील अन्य भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांना या फेरीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. 

सातव्या फेरीपूर्वी गुकेश आणि नेपोम्नियाशी यांचे प्रत्येकी चार गुण होते. या फेरीत नेपोम्नियाशी आणि नाकामुरा यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने गुकेशकडे एकटय़ाने अग्रस्थान मिळवण्याची संधी होती, पण ती त्याला साधता आली नाही. वेळ कमी असल्याने गुकेशला चाली रचण्यासाठी घाई करावी लागली आणि त्याच्याकडून चुका घडल्या. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील आपला पहिला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, प्रज्ञानंदने अमेरिकेच्या अनुभवी फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले, तर नाशिककर विदितने अझरबैजानच्या निजात अबासोवविरुद्ध बरोबरीवर समाधान मानले. अबासोवला या स्पर्धेत सर्वात खालचे मानांकन असून गेल्या दोन फेऱ्यांमध्ये त्याला गुकेश आणि प्रज्ञानंदने पराभूत केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध केवळ बरोबरीची नोंद करणे हा विदितसाठी निराशाजनक निकाल मानला जात आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 LSG vs DC : जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा लखनऊवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय

या निकालांनंतर नेपोम्नियाशीने अग्रस्थान भक्कम केले असून गुकेश, प्रज्ञानंद आणि कारुआना प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत. विदित आणि नाकामुरा प्रत्येकी ३.५ गुणांसह संयुक्त पाचव्या, फिरुझा २.५ गुणांसह सातव्या, तर अबासोव दोन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. या स्पर्धेच्या आता सात फेऱ्या झाल्या असून तितक्याच फेऱ्या शिल्लक आहेत. आठव्या फेरीपूर्वी विश्रांतीचा दिवस आहे.

महिला विभागात, आर. वैशालीला कामगिरी उंचावण्यात पुन्हा अपयश आले. तिला स्पर्धेतील एकूण तिसरी आणि सलग दुसरी हार पत्करावी लागली. चीनच्या ले टिंगजीने वैशालीला पराभूत केले. तसेच कोनेरू हम्पीची पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम राहिली. तिला अ‍ॅना मुझिचुकने बरोबरीत रोखले. या निकालांनंतर महिला विभागातील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. चीनची टॅन झोंगी पाच गुणांसह अग्रस्थानी असून दुसऱ्या स्थानावरील अलेक्झांड्रा गोर्याचकिनाचे ४.५ गुण आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates chess tournament alireza firuza defeats d gukesh sport news amy
Show comments