मुंबई : गेल्या तीन कॅन्डिडेट्स स्पर्धांमध्ये सात फेऱ्यांअंती आघाडीवर असलेल्या बुद्धिबळपटूनेच अखेरीस बाजी मारल्याचे पाहायला मिळाले होते. यंदाच्या स्पर्धेत आता सात फेऱ्या झाल्या असून ‘फिडे’च्या ध्वजाखाली खेळणारा रशियाचा इयान नेपोम्नियाशी अग्रस्थानावर आहे. त्यामुळे सध्या तरी जेतेपदासाठी नेपोम्नियाशीचेच पारडे जड मानले जाऊ शकते, असे मत नामांकित बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’मधील विजेत्या नेपोम्नियाशीने यंदाच्या स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याअंती नेपोम्नियाशीला ४.५ गुणांसह अग्रस्थान मिळवण्यात यश आले आहे. आता विश्रांतीच्या दिवसानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यातही सात फेऱ्या होणार आहेत.
हेही वाचा >>>IPL 2024 : युजवेंद्र चहलने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत झळकावले द्विशतक
‘‘गेल्या तीन ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धांत सात फेऱ्यांअंती जो स्पर्धक आघाडीवर होता, त्यानेच १४ फेऱ्यांची ही स्पर्धा जिंकली होती. २०१८ मध्ये सात फेऱ्यांनंतर अमेरिकेचा फॅबियानो कारुआना पाच गुणांसह आघाडीवर होता आणि अखेरीस तोच विजेता ठरला होता. २०२०च्या स्पर्धेत करोनाने मोठा अडथळा आणला होता. २५ मार्च २०२० रोजी सातवी फेरी झाली आणि ती स्पर्धा थांबली होती. त्यानंतर थेट वर्षभराने १९ एप्रिल २०२१ मध्ये पुढील फेऱ्यांना सुरुवात झाली. त्या वेळी सात फेऱ्यांअंती नेपोम्नियाशी आघाडीवर होता. पुढे २०२२ मध्ये माद्रिद येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’मध्येही नेपोम्नियाशीने ५.५ गुणांसह सात फेऱ्यांअंती आघाडी मिळवली होती. दोन्ही वेळा तोच अंतिम विजेता ठरला. आता तो जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने खेळत आहे आणि इतिहासही त्याच्या बाजूने आहे,’’ असे गोखले म्हणाले.
सध्या भारताचे डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद हे ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’मध्ये संयुक्त दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्यासह कारुआनाचे समान चार गुण आहेत. त्यामुळे या तिघांना, तसेच भारताचा अन्य बुद्धिबळपटू विदित गुजराथीला अजूनही संधी असल्याचे गोखले यांना वाटते.
‘‘गेल्या तीन स्पर्धा आणि या वर्षी टोरंटो येथे होत असलेल्या स्पर्धेत एक मोठा फरक आहे. गेल्या तीन ‘कॅन्डिडेट्स’मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नव्हता, तर यंदा तब्बल तीन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भारतातर्फे खेळत आहेत. यापैकी गुकेश आणि प्रज्ञानंद हे आघाडीवरील नेपोम्नियाशीपेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही चांगली संधी आहे. विदित गुजराथीनेही (३.५ गुण) धडाकेबाज खेळ केला असून तोसुद्धा शर्यतीत परत येऊ शकेल,’’ असे गोखले यांनी नमूद केले.