मुंबई : भारताचे चार बुद्धिबळपटू अजूनही कॅनडाचा व्हिसा मिळण्याच्या प्रतीक्षेत असतानाच प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. टोरंटो शहरात ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत खुला विभाग आणि महिला विभागात मिळून चार भारतीय बुद्धिबळपटू सलामीलाच आमनेसामने येणार आहेत.
खुल्या विभागात डी. गुकेशसमोर सलामीच्या लढतीत अनुभवी विदित गुजराथीचे आव्हान असेल, तर महिला विभागात आर. वैशालीची गाठ कोनेरू हम्पीशी पडणार आहे. खुल्या विभागातील अन्य भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदचा सामना मूळचा इराणचा असलेल्या, पण फ्रान्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अलिरेझा फिरौझाशी होणार आहे.
हेही वाचा >>>WPL 2024: षटकाराने गाडीची काच तोडणारी एलिसा पेरी दिवसाला पिते १२ कप मसाला चहा
३ एप्रिलला उद्घाटन सोहळा रंगणार असून ४ एप्रिलपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीत (५ एप्रिल) प्रज्ञानंद आणि गुकेश समोरासमोर येतील, तर तिसऱ्या फेरीत (६ एप्रिल) प्रज्ञानंदची गाठ विदितशी पडेल. ‘कॅन्डिडेट्स’च्या खुल्या विभागातील विजेता बुद्धिबळपटू जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याचा जगज्जेता डिंग लिरेनला आव्हान देईल, तर महिला विभागातील विजेती बुद्धिबळपटू चीनच्या जगज्जेत्या जू वेन्जूनविरुद्ध खेळेल.
‘कॅन्डिडेट्स’मध्ये दोन्ही विभागांत सहभागी आठही बुद्धिबळपटू साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध दोन वेळा खेळतील. तसेच या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच खुल्या आणि महिला विभागाचे सामने एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी खेळवले जाणार आहेत.