‘‘सचिनच्या निवृत्तीच्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. त्याने जेव्हा हा निर्णय घेतला, तेव्हा मी त्याच्या पाठीशी राहिली. सचिनशिवाय क्रिकेटची कल्पना करू शकते, पण क्रिकेटशिवाय सचिन हा विचारच मी करू शकत नाही,’’ अशा शब्दांत अंजली तेंडुलकरने आपल्या पतीच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
१९९५मध्ये अंजली आणि सचिनचा प्रेमविवाह झाला. तेव्हापासून गेली १८ वष्रे सचिनचे यशापयश, सुख-दु:ख या प्रत्येक गोष्टीमध्ये तिने त्याची साथ दिली आहे. त्यामुळेच निवृत्तीच्या प्रसंगी सर्व क्रिकेटरसिकांप्रमाणे तीसुद्धा भावनिक झाली होती. ती पुढे म्हणाली, ‘‘सचिन कधीही पूर्णत: क्रिकेटपासून दूर राहिलेला नाही. त्यामुळे मला आता काय होईल हे माहीत नाही. तो कधीही आपले दडपण चेहऱ्यावर दाखवत नाही. घरीसुद्धा तो कधीच आपल्या भावना बोलून दाखवत नाही. भावनांवर नियंत्रण मिळवायला सचिनला चांगले जमते. घरच्या काही जबाबदाऱ्या आता मी आनंदाने त्याच्यावर सोपवू शकेन.’’
‘‘सचिनच्या निवृत्तीप्रसंगी जी लोकांची भावनिकता दिसून येते आहे, ती भारावून टाकणारी आहे. पण सचिन हा मुंबईचा आहे, देशाचा आहे आणि मग आमचा आहे,’’ असे अंजलीने या वेळी सांगितले. मुलगी सारासुद्धा सचिनप्रमाणेच आहे, हे मांडताना अंजली म्हणाली, ‘‘सारा वडिलांप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करत नाही. आता मुलांना कळते आहे, आपल्या वडिलांच्या आयुष्यात क्रिकेटचे आणि चाहत्यांचे काय स्थान आहे.’’
सचिनच्या अखेरच्या कसोटी सामन्यात त्याचा मुलगा अर्जुन बॉलबॉयच्या भूमिकेत आहे. याच वानखेडेवर सचिननेही आधी बॉलबॉय म्हणून काम केले होते. याविषयी अंजली म्हणाली, ‘‘वडिलांच्या शेवटच्या कसोटी सामन्यात मैदानावर बॉलबॉय म्हणून अवतरलेल्या अर्जुनसाठी हा संस्मरणीय क्षण आहे. खरे तर ही आम्ही सचिनसाठी आश्चर्यकारक भेट दिली.’’
सचिनने माझ्याशी भविष्याविषयी चर्चा केल्यानंतर त्याने दोनशेव्या कसोटीनिशी निवृत्तीचा निर्णय घेतला, असे अंजलीने सांगितले. ती म्हणाली, ‘‘सचिन नेहमी म्हणायचा की, जेव्हा मी मैदानावर १०० टक्के कामगिरी करू शकणार नाही, तेव्हा तीच क्रिकेटला अलविदा करण्याची योग्य वेळ असेल. एके दिवशी त्याने आपला निर्णय मला सांगितला आणि आम्ही यावर चर्चा केली.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा