भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन हे अध्यक्षपदी असेपर्यंत आम्ही भारतीय संघास पुरस्कृत करणार नाही असे सहारा समूहाचे मुख्य सुब्रतो रॉय सहारा यांनी येथे सांगितले.
श्रीनिवासन यांच्या कारभाराविषयी कडाडून टीका करीत रॉय म्हणाले, शशांक मनोहर हे मंडळाचे अध्यक्ष असताना आमचे मंडळाशी अतिशय सौहार्दाचे संबंध होते. श्रीनिवासन अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांचे आणि आमचे सूर जमले नाहीत. ते अध्यक्षपदी असेपर्यंत आम्ही भारतीय संघास प्रायोजित करणार नाही. मंडळाचा कारभार कसा चालवायचा हे श्रीनिवासन यांना माहीत नाही. ते अतिशय गर्विष्ठ आहेत. जेव्हा सहारा समूहाकडून एखादी चूक होते तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारत असतो. आता तर श्रीनिवासन यांचे जावई स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणास सर्वस्वी बीसीसीआय जबाबदार आहे. जेव्हा आम्ही फ्रँचाईजी विकत घेतली तेव्हा ९४ सामने देण्याचे आश्वासन आम्हास देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात आमची ६४ सामन्यांवरच बोळवण करण्यात आली. याबाबत श्रीनिवासन यांच्याकडे आम्ही गाऱ्हाणे मांडले. मात्र त्यांनी आम्हास कोणताही प्रतिसाद दिला नाही.  

Story img Loader