बेजबाबदार खेळामुळे भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच सामना संपल्यानंतरच्या धोनीच्या उद्गारामुळे नवे वादळ निर्माण झाले आहे. वरुण आरोनचे प्रदर्शन वगळता या कसोटीमधील सकारात्मक गोष्टी कोणत्या, या प्रश्नाचे उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘‘वरुण आरोनची कामगिरी चांगली झाली. मात्र ही कसोटी तीनच दिवसांत संपल्याने आम्हाला दोन अतिरिक्त दिवसांची विश्रांती मिळणार आहे.’’
धोनीच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटरसिक नाराज झाले आहेत. पराभवातून शिकण्याऐवजी विश्रांती आवडणाऱ्या धोनीची भूमिका वादग्रस्त ठरली आहे. याबाबत सोशल मीडियावर क्रिकेटरसिकांनी धोनीवर शाब्दिक फटकारे ओढले आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार मँचेस्टर कसोटीनंतर भारतीय संघाला चार दिवसांची विश्रांती मिळणार होती. ती आता सहा दिवसांची झाली आहे. तूर्तास तरी भारतीय संघाला विश्रांतीची नव्हे तर दररोज कठोर मेहनतीची गरज असल्याची प्रतिक्रिया सामान्य क्रिकेटरसिकांमध्ये आहे.

Story img Loader