पीटीआय, दुबई
सामना कुठलाही असला तरी मैदानावरील दडपणापेक्षा बाहेरील दडपण वेगळे आणि आव्हानात्मक असते. अर्थात, आता हे दडपण झुगारून जिंकायचे कसे आणि खेळाचा आनंद घ्यायला भारतीय संघाला चांगले उमगले असल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहितने स्वत:ला काहीसे बाजूला करत सहकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांची पाठ थोपटली. भारतीय संघामध्ये अपरिमित गुणवत्ता, खोलवर ताकद आणि समजूतदारपणा आहे. यामुळेच संघातील वातावरण आनंदी राहिले आणि बाहेरील दडपणाला झुगारण्याची कला त्यांना अवगत झाली. यामुळेच हे विजेतेपद साकार झाले, असे रोहित म्हणाला.

रोहितच्या तिशी किंवा चाळिशीतील खेळीनंतर बाद होण्यावर टीका होत होती. मात्र, अंतिम सामन्यातील त्याच्या ७६ धावांच्या खेळीने त्याच्यातील वेगळेपण उठून दिसले. ‘‘प्रत्येक खेळाडूला भारताचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्वदेखील करण्याची इच्छा असते. पण या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. यापूर्वी २०१९ मध्ये भरपूर योगदान देऊनही आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही. पण कमी धावा करूनही या वेळी विजेतेपदापर्यंत पोहोचलो याचे समाधान अधिक आहे. त्यामुळेच कुठल्याही वैयक्तिक खेळीपेक्षा संघाला अशा स्थितीत आणणे हे महत्त्वाचे होते. त्यामुळेच अंतिम सामन्यात मी आक्रमकतेचे वेगळेपण दाखवून दिले. त्यामुळे नंतरचे फलंदाज संयमाने खेळू शकले,’’ असेही रोहित म्हणाला.

खेळपट्टी आव्हानात्मक

दुबई येथील प्रत्येक खेळपट्टी आव्हानात्मक होती. फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल असे वाटत होते, पण एकही सामना असा झाला नाही की तेथे चेंडू कायम वळत होते. त्यामुळे फलंदाजांना अंदाज घेणे कठीण गेले. चेंडू वळला तर एक वेळेस फलंदाज त्याचा सामना करूदेखील शकेल, पण चेंडू वळणार असे वाटत असताना तो सरळ येणे केव्हाही घातक असते. जे अंतिम सामन्यात विराट कोहलीबाबत घडले. चेंडू टप्प्यावर पडून तो वळणार अशा विचाराने कोहली खेळला. प्रत्यक्षात चेंडू सरळ गेला.

एकाच ठिकाणी खेळल्याचा फायदा

भारताला या स्पर्धेत एकाच ठिकाणी खेळल्याचा फायदा झाला अशी टीका होत आहे. पण हा निर्णय आमच्या नियंत्रणाच्या बाहेर होता. व्यवस्थापनाने ही गोष्ट हाताळली. त्यामुळे संघावर उगाच टीका झाली. खेळपट्टीच्या वापराबद्दल बोलाल, तर येथे आल्यावर या खेळपट्ट्यांचा किती उपयोग झाला हे लगेच दिसून येत होते आणि सामने एकाच खेळपट्टीवर झाले नाहीत. खेळपट्टी संथ होत्या. त्यामुळेच आम्ही फिरकी गोलंदाजांवर विश्वास ठेवला. परिस्थिती कठीण होती. पण फिरकी गोलंदाजांनी चांगले जुळवून घेतले.

खेळणे सुरूच ठेवणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून रोहित शर्माच्या कारकीर्दीविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. चॅम्पियन्स स्पर्धेतील यशातही या चर्चा थांबल्या नव्हत्या, पण रोहितनेच या सर्वांना पूर्णविराम दिला. ‘‘मी अजून खेळणार आहे. भविष्यात वेगळे असे नियोजन अजून केलेले नाही. पण जे सुरू आहे, ते तसेच सुरू राहणार आहे. मग माझ्या निवृत्तीची चर्चा कशाला,’’ अशा शब्दांत रोहितने आपल्या भविष्याची चर्चा थांबवली.