पीटीआय, अॅडलेड

ऑस्ट्रेलियात विजय मिळवायचा झाल्यास तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्यावाचून पर्याय नाही. मात्र, फलंदाज म्हणून आम्ही कमी पडलो. तसेच गोलंदाजांनीही अधिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. जसप्रीत बुमरा कितीही भेदक मारा करत असला, तरी तो एकट्याने प्रतिस्पर्ध्याला गारद करू शकत नाही. त्याला अन्य गोलंदाजांची साथ आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर व्यक्त केली.

अॅडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाइट) झालेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाहुण्या भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवला. केवळ अडीच दिवस चाललेल्या या कसोटीत भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. भारताला दोनही डावांत २०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

‘‘ऑस्ट्रेलियात खेळताना कसोटी सामना जिंकायचा झाल्यास तुम्ही मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे असते. गुलाबी चेंडूविरुद्ध धावा करणे आव्हानात्मक असेल हे आम्हाला ठाऊक होते. मात्र, आम्ही अधिक चांगली फलंदाजी निश्चित करू शकलो असतो. याआधी आम्ही ते करूनही दाखवले आहे. विशेषत: पहिल्या डावात आम्ही ३०-४० धावा अधिक केल्या असत्या, तर बराच फरक पडला असता,’’ असे रोहित म्हणाला.

हेही वाचा >>>IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

तसेच गोलंदाजांच्या कामगिरीवरही त्याने नाराजी व्यक्त केली. अॅडलेड कसोटीत बुमराने (४/६१) टिच्चून मारा केला, पण दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सहजपणे धावा करता आल्या. ‘‘बुमरा सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र, आम्ही केवळ एका गोलंदाजावर अवलंबून राहू शकत नाही. अन्य गोलंदाजांनी जबाबदारी घेऊन संघासाठी योगदान देणे गरजेचे आहे. मोहम्मद सिराज, हर्षित राणा, नितीश रेड्डी, आकाश दीप आणि प्रसिध कृष्णा यापैकी ज्या कोणाला संधी मिळेल, त्याने आपली भूमिका चोख पार पाडणे आवश्यक आहे,’’ असा स्पष्ट संदेश रोहितने गोलंदाजांना दिला.

बुमरा आणि सिराजचा अपवाद वगळता भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांना कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार दडपण टाकणे योग्य ठरणार नाही हेसुद्धा रोहित जाणतो. ‘‘आमचे बरेचसे वेगवान गोलंदाज नवखे आहेत. आम्ही बऱ्याच योजना आखतो आणि त्यांच्याशी सतत चर्चा करतो. मात्र, त्यांनी चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे. बुमरा दोनही बाजूंनी सकाळ ते संध्याकाळ गोलंदाजी करू शकत नाही. अन्य गोलंदाजांची त्याला साथ आवश्यक आहे. बुमराने पाचही कसोटीत खेळावे अशी आमची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी त्याच्यावरील ताण कमी करावा लागेल,’’ असे रोहित म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?

शमीबाबत खबरदारी…

● वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी भारतीय संघाची दारे खुली असली, तरी त्याने आताच दुखापतीतून पुनरागमन केल्याने त्याच्याबाबत विशेष खबरदारी बाळगली जात असल्याचे रोहित म्हणाला.

● ‘‘मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळताना शमीच्या गुडघ्याला पुन्हा सूज आली. त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्याला संघात स्थान दिल्यानंतर कसोटीदरम्यान तो पुन्हा जायबंदी होईल अशी परिस्थिती आम्हाला उद्भवू द्यायची नाही. त्याने १०० टक्के तंदुरुस्त असायला हवे,’’ असे रोहितने स्पष्ट केले.

● गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शमीच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर वर्षभर तो मैदानाबाहेर होता. नुकतेच त्याने पुनरागमन करताना रणजी सामन्यात ४२ षटके टाकली, तर मुश्ताक अली स्पर्धेत १३ दिवसांत सात सामने खेळले. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय पथकाकडून शमीला तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळणे ही केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात होते.

Story img Loader