आशिया चषक स्पर्धेत भारताने नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले या स्पर्धेतील सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आलेली असून, रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचसोबत शिखर धवनला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याचसोबत महाराष्ट्राच्या केदार जाधव आणि अंबाती रायुडू यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे.
भारताचा सलामीचा सामना उद्या हॉंगकॉंग या संघाशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली असून यांच्या पुनरागमनाचा भारताला फायदा होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. संघातील खेळाडूंच्या पुनरागमनाबद्दल रोहित म्हणाला की रायुडू आणि केदार हे दोघेही प्रतिभावान खेळाडू आहेत. या स्पर्धेसाठी त्यांचे संघात पुनरागमन होणे हि आनंदाची बाब आहे. याबरोबरच ही गोष्ट संघासाठीही अत्यंत लाभदायक आहे. कारण या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोबल उंचावण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षाही आहेत.
Ambati Rayudu and Kedar Jadhav are important members of the team. Them making a comeback is good for the team. It is important for us that they perform well. I am happy that they are back: Rohit Sharma, team India captain for #AsiaCup2018 pic.twitter.com/dK5RaTI1ES
— ANI (@ANI) September 17, 2018
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या सामन्यासाठी सराव करायला सुरुवात केली आहे. पण सरावाला मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गैरहजर असल्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने यावेळी भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले.