India vs Australia 2023 2nd ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रंगला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिल्या तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. संपूर्ण क्रिडाविश्वात आजच्या सामन्याची चर्चा रंगलीय. कारण ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून ११८ धावांचं लक्ष्य गाठलं आणि भारताचा दारुण पराभव केला. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी केली आहे. सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघाच्या विजयाच्या रणनितीबाबत मोठा खुलासा केला आहे.
स्मिथने सामना जिंकल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, हे खूप लवकर आटोपलं. फक्त ३७ षटकांची इनिंग नेहमी पाहायला मिळत नाही. नवीन चेंडूने मिचेल स्टार्कने भारतीय फलंदाजांना दबावात टाकलं. ही दिवसाची खूप चांगली सुरुवात होती. खेळपट्टीवर कशाप्रकारे मदत मिळेल, याबाबत मला माहित नव्हतं. निश्चित धावसंख्येचा मनात विचार केला नव्हता. हे फक्त मैदानात जाऊन कौशल्य दाखवणं आणि भारतीय खेळाडूंना दबावात आणण्यासाठी होतं आणि यात आम्हाला यश मिळालं.
मार्श आणि हेडचं केलं कौतुक
ऑस्ट्रेलियाचे धडाकेबाज फलंदाज मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड सलामीला मैदानात उतरताच भारतीय गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी केली. मार्श-हेडने नाबाद अर्धशतक ठोकून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मिचेल मार्शने ६ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी साकारली. ट्रेविस हेडने १० चौकार ठोकून ५१ धावा कुटल्या. या दोघांच्या चमकदार कामगिरीबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला, “हेड आणि मार्शने सुरुवातीपासूनच अप्रतिम फलंदाजी केल्यामुळं धावसंख्येचा आलेख चढता राहिला. ते शेवटपर्यंत खेळले आणि आम्ही मागील सामन्यानंतर पुनरागमन करण्यात यशस्वी झालो. त्यानंतर झेलबाबत बोलताना स्मिथने म्हटलं, “मला कॅच ऑफ द सेंचुरीबद्दल माहित नाही. पण असा झेल पकडून मला आनंद झाला. हार्दिक खूप मोठा खेळाडू आहे. त्याच्या झेल पकडू शकलो, याचा मला आनंद आहे.”