Suryakumar Yadav Says I thought it was a par score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१२ डिसेंबर) खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने गेबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया पुढे खेळू शकली नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी १३.५ षटकात १५४ धावा करत सामना जिंकला. यासह त्याने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली.
टीम इंडियाचा कर्णधार पराभवावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, जेव्हा भारताचा डाव संपला, तेव्हा असे वाटत होते की ही धावसंख्या पुरेशी आहे. पण पॉवरप्लेमध्येच दक्षिण आफ्रिकेने इतकी दमदार फलंदाजी केली की सामना आमच्या हातातून गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूचा सामना करताना ५६ धावांची खेळी केली. ज्यामध्ये ५ चौकार आणि ३ षटकार मारले. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ५-६ षटकांत चांगली फलंदाजी केली –
दुसरा सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “पहिला डाव संपल्यानंतर मला वाटले की ही पुरेशी धावसंख्या आहे, पण दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ५-६ षटकांत चांगली फलंदाजी केली. तिथेच सामना आमच्या हाताबाहेर गेला होता. आम्हाला अशा प्रकारचे दर्जेदार क्रिकेट खेळायचे होते, खेळाडूंनी मैदानावर जावून स्वत: व्यक्त करावे. या सामन्यात ओल्या चेंडूने गोलंदाजी करणे सोपे नव्हते, पण भविष्यातही असे प्रसंग येतील आणि त्यामुळेच आम्हाला त्यातून शिकावे लागेल. आता आमची नजर तिसऱ्या टी-२० सामन्यावर आहे.”
दोन हजार धावा पूर्ण करणारा सूर्यकुमार हा चौथा भारतीय ठरला –
आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शानदार कामगिरी केली. भारतासाठी टी-२०मध्ये २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी केएल राहुल (२२६५), रोहित शर्मा (३८५३) आणि विराट कोहली (४००८) आहेत.