दुखापतीतून सावरल्यानंतर अ-गटातील अव्वल संघ पंजाबविरुद्ध ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या रणजी सामन्यासाठी अजित आगरकर सज्ज झाला आहे. वानखेडे स्टेडियमवर हंगामाच्या प्रारंभी झालेल्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यात आगरकरला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मागील तीन सामन्यांत खेळू शकला नाही.
भारतीय संघ व्यवस्थापनाने परवानगी दिल्यामुळे आगामी रणजी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ अधिक मजबूत होईल. बंगालविरुद्धचा सामना अनिर्णीत राखून फक्त पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळविण्यात मुंबईने समाधान मानले होते. आता पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात वेगवान गोलंदाज बलविंदरसिंग संधू (ज्यु.) आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू इक्बाल अब्दुल्ला यांचा समावेश करण्यात आला आहे.
संघ : अजित आगरकर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, रोहित शर्मा, कौस्तुभ पवार, हिकेन शाह, अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, रमेश पोवार, अंकित चव्हाण, इक्बाल अब्दुल्ला, धवल कुलकर्णी, बलविंदरसिंग संधू (ज्यु.) आणि शार्दुल ठाकूर, प्रशिक्षक – सुलक्षण कुलकर्णी