कर्णधार हा संघाचा कणा असला तरी सर्वाभिमुख असायला हवा. तो खेळाडूंचा चांगला मित्र, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ असायलाच हवा, पण त्याचबरोबर तो खेळाडू आणि संघटनेमधला दुवा असायला हवा. खेळाडू, संघटना, संघटक, निवड समिती, प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटू यांच्याबरोबर त्याचे चांगले ऋणानुबंध असायला हवेत आणि ते त्याने जपायलाही हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने सातव्या दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानामध्ये व्यक्त केले.
कर्णधार जिद्दी आणि धैर्यवान असावा
प्रत्येक कर्णधार हा जिंकण्यासाठीच मैदानात उतरत असतो. काही वर्षांपूर्वी विदेशातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यासाठीच बहुतेक जणांचा कल होता, पण आता काळ बदलला आहे. २००२ साली आम्ही इंग्लंडच्या दौऱ्यावर होतो, हेडिंग्लेला सामना होता. खेळपट्टी तिथल्या वातावरणाला आणि गोलंदाजांना पोषक होती. कोणत्याही कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी पाचारण करून झटपट बळी मिळवले असते; पण गांगुलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आम्ही तो सामना जिंकलो. भारतीय कर्णधाराचे असेच एक उदाहरण द्यायचे म्हणजे भारतीय संघ १९७४-७५ साली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. मन्सूर अली खान पतौडी भारताचे कर्णधार होते. आपण पहिले दोन्ही सामने गमावले होते; पण त्यानंतर पतौडी यांनी संघामध्ये अशा प्रकारे आत्मविश्वास भरला की, त्यानंतरचे दोन्ही सामने भारताने जिंकले. असे फार कमी वेळा पाहायला मिळते.
कर्णधारापेक्षा संघ चांगला असावा
जर संघातील दहा खेळाडू सामना जिंकवून देत नसतील, तर एकटा कर्णधार काहीही करू शकत नाही. त्यामुळे कर्णधारापेक्षा संघ चांगला असायला हवा. कर्णधाराचा संघावर विश्वास असायला हवा. संघातील खेळाडूंना नेमके काय हवे आहे आणि कोणत्या खेळाडूला कधी वापरायचे हे त्याला माहिती असायला हवे.
कर्णधारासाठी दैवही महत्त्वाचे
कर्णधार हा ९० टक्के सामने दैवाच्या जोरावर आणि १० टक्केगुणवत्तेच्या जोरावर जिंकत असतो, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिची बेनॉ यांनी सांगितले होते. असेच काहीसे इंग्लंडचे माजी कर्णधार इयान बोथम यांनीही सांगितले आहे.
गोलंदाजांना कर्णधारपदाची संधी कमी
माझ्या मते गोलंदाजांना कर्णधारपद फार कमी वेळा मिळते. भारतात ३२ कसोटी कर्णधार झाले, पण त्यापैकी फक्त चारच गोलंदाज होते. इंग्लंडकडूनही बॉब विलीस आणि जॉन एम्बुरी यांनाच हा मान मिळाला. कसोटी सामना जिंकण्यासाठी २० बळी लागतात, त्याचा विचार गोलंदाज करत असतात. माझ्या मते गोलंदाज उत्तम पद्धतीने विचार करू शकतात, पण असे विचार करणाऱ्या इरापल्ली प्रसन्ना, झहीर खान, जवागल श्रीनाथ, शेन वॉर्न यांना कधीही देशाचे नेतृत्व करायला मिळाले नाही.