एखाद्या गोष्टीची आवड असली की सर्व काही शक्य होते. लहानपणापासूनच बुध्दिबळाची आवड असल्याने त्यात अव्वल होण्यासाठी अधिकाधिक कष्ट करत गेलो. त्यामुळे यापुढेही बुध्दिबळमध्येच कारकिर्द करणार आहोत, असा ठाम निश्चय नाशिकचा युवा बुध्दिबळपटू विदीत गुजराथी याने व्यक्त केला. प्रवीण ठिपसे आणि अभिजीत कुंटे यांच्यानंतर ‘ग्रँडमास्टर’ होण्यासाठीचे सर्व निकष विदीतने पूर्ण केले असून महाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर म्हणून त्याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी येथे पुण्याच्या लक्ष्य संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत विदीतने आपल्या यशाचे रहस्य उलगडले.
याआधी देशात बुध्दिबळच्या स्पर्धाचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे एखाद्या खेळाडूत गुणवत्ता असली तरी ती सिध्द करण्याची संधी फारशी उपलब्ध होत नव्हती. कालांतराने हे चित्र बदलले. स्पर्धा अधिक होऊ लागल्याने ग्रँडमास्टर होण्यासाठीचे निकषही कमी दिवसांमध्ये पूर्ण होऊ लागले. त्यामुळेच कमी वयात ग्रँडमास्टर होणाऱ्यांची संख्याही वाढत गेली, असे अवघ्या १८ व्या वर्षी या टप्प्यापर्यंत मजल मारणाऱ्या विदीतने नमूद केले. आपल्या या यशात आईवडील, बहीण यांच्यासह अनेक मार्गदर्शक आणि आपल्याला मदत करणाऱ्या लक्ष्य या संघटनेचा अधिक वाटा आहे. यापुढील आपले लक्ष्य वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशीप असल्याचे त्याने यावेळी सांगितले. क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी विदीतच्या या कामगिरीचा नाशिकला अभिमान वाटावयास हवा, असे सांगितले. खेळाडूंच्या अनेक समस्या असतात. समाजाने त्यांच्यामागे उपस्थित राहाणे आवश्यक आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या सैनिकांप्रमाणे विदीतकडे हिंमत आहे. कोणत्याही बडय़ा खेळाडूशी खेळण्यास तो घाबरत नाही, या शब्दांत त्यांनी विदीतचा गौरव केला. बाम यांनी यावेळी खेळाडूंकडे शासनाकडून होणारे दुर्लक्षही कथन केले. खेळाडूंना आश्रितासारखी वागणूक दिली जाते. भिकाऱ्यांना घरे मिळतात, परंतु खेळाडूंना नाही. मग घरासाठी खेळाडूंनी भीक मागायची काय, असा सवालही त्यांनी केला.

Story img Loader