एकत्र राहा, अनोळखी व्यक्तींकडून काहीही स्वीकारू नका, झोपडपट्टीत जाऊ नका आणि डासविरोधी मलम विसरू नका.. या सूचना आहेत चक्क विश्वचषकासाठी वारी करणाऱ्या चाहत्यांसाठी. फुटबॉल विश्वचषक हा क्रीडा जगतातला सर्वोच्च सोहळा निर्धोकपणे व्हावा, यासाठी संयोजक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर ब्राझीलमधील अस्थिर वातावरण, हिंसक घटना लक्षात घेऊन संयोजकांनी ब्राझीलमध्ये दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी अशी सूचनावलीच जाहीर केली आहे. आपापल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी विविध देशांतले चाहते ब्राझीलमध्ये अवतरणार आहेत. विश्वचषकाच्या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी या समस्त चाहत्यांना या सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
स्पर्धेसाठीचा प्रचंड खर्च, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेची अनास्था आणि गुन्हेगारी या प्रकारांमुळे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, अर्जेटिनातील दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी ब्राझीलने विशेषत्वाने सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार बोकाळला होता. अमली पदार्थ वितरक आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची दमछाक झाली होती.
ब्राझीलची राजधानी रिओ डी जानेरोमध्येही झोपडपट्टय़ांमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही. रिओमध्येही सातत्याने हल्ले, चोरीच्या घटना घडत आहेत. शहरातील गुन्ह्य़ांच्या प्रमाणात २३.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण केवळ १० टक्के होते. रिओ इन्स्टिटय़ूट फॉर पब्लिक स्टडीजने या संदर्भातील आकडे प्रसिद्ध केले आहेत. शुक्रवारी रोचिना नावाच्या झोपडपट्टीत हिंसाचार झाला होता. विश्वचषकादरम्यान इंग्लंडचा संघ जिथे राहणार आहे, त्या पंचतारांकित हॉटेलपासून हे ठिकाण नजीकच्या अंतरावर आहे. साखळीचोरीच्या, किंमती वस्तू लुटण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊनच चाहत्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
रिओ शहराचा काही भाग जंगलासारखा आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हल्ला, ओलीस ठेवणे, बलात्कारासारख्या घटना केव्हाही घडू शकतात. विश्वचषकासाठी रिओ शहरात पाच लाख प्रेक्षक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. एवढय़ा प्रचंड प्रमाणावर चाहते येणार असल्याने सुरक्षितता पुरवण्यावर मर्यादा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader