पॅरिस : वयाच्या २१व्या वर्षीच तीन ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने आता तातडीने विम्बल्डन विजेतेपद राखण्याचे आव्हान असल्याचे मान्य केले. फ्रेंच विजेतेपद जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करतानाच अल्कराझने आपल्या समोरील आव्हानांचा विचार करायला सुरुवात केली होती. क्ले कोर्ट (लाल माती), ग्रास कोर्ट आणि हार्ड कोर्टवर विजेतेपद मिळवणारा अल्कराझ सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘माझा खेळ हा स्पर्धेच्या पृष्ठभागाला अनुकूल आहे. ज्या पृष्ठभागावर स्पर्धा असेल, त्याचा सराव मी करतो. क्ले कोर्टवर खेळायला शिकलो असलो, तरी मला हार्ड कोर्ट अधिक आवडते. नोव्हाक जोकोविचवर सातवेळा विजय मिळवल्याने ग्रास कोर्टवरील यशही मला खुणावते. विम्बल्डन विजेतेपद राखणे हे माझ्यासमोरील तातडीचे उद्दिष्ट असेल,’’ असे अल्कराझ म्हणाला. ‘‘ग्रँडस्लॅम जिंकणे सोपे नाही. मैदानातील सरावाबरोबर तुम्हाला खेळाचा अभ्यास करता यायला हवा आणि तुमची मानसिकता खंबीर असायला हवी,’’असे अल्कराझने सांगितले.

हेही वाचा >>> BAN vs SA T20 World Cup: लेगबाईज नाकारल्या, बाऊंड्री मिळूनही मिळाल्या ० धावा आणि नियमाने केला बांगलादेशचा घात

अजून फक्त एकदाच

अल्कराझ मोठी स्पर्धा जिंकला की त्या विजेतेपदाची तारीख तो आपल्या शरीरावर गोंदवून घोतो. पायाच्या उजव्या घोट्यावर २०२३च्या विम्बल्डन विजेपदाची तारीख आणि स्ट्रॉबेरीची प्रतिमा गोंदली आहे. डाव्या हातावर २०२२ मधील अमेरिकन स्पर्धेच्या विजेतेपदाची तारीख आहे. आता डाव्या घोट्यावर तो फ्रेंच विजेतेपदाची तारीख आणि आयफेल टॉवरची प्रतिमा गोंदवणार आहे. आईने आता काय प्रत्येक विजेतेपदाची तारीख गोंदणार का ? असे विचारल्यावर अल्कराझने अजून फक्त एकच असे सांगितले. चार ग्रँडस्लॅम स्पर्धेचे पहिल्यांदा विजेतेपद मिळवले की आपण त्याची तारीख शरीरावर गोंदवण्याचे ठरवले असल्याचे अल्कराझ म्हणाला. म्हणजे आता अल्कराझला फक्त एक म्हणजे ऑस्ट्रेलियन विजेतेपद खुणावत आहे.

नागल ऑलिम्पिक सहभागासाठी सज्ज

यंदाच्या पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत एकेरीत भारताचा सुमित नागल हा एकमेव चेहरा पाहण्यास मिळू शकतो. जागतिक क्रमवारीत १८ क्रमांकाची झेप घेत ७७व्या स्थानावर आलेला सुमित या क्रमवारीमुळे ऑलिम्पिकमधील त्याचे स्थान निश्चित झाले आहे. सुमित नागलने रविवारी जर्मनीतील चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपद मिळवले. ऑलिम्पिक पात्रतेच्या निकषानुसार पहिले ५६ मानांकित खेळाडू ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरतील. त्यानंतर जागतिक क्रमवारीनुसार प्रत्येक देशाचे चार खेळाडू खेळू शकतात.

सिन्नेर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी

इटलीच्या यानिक सिन्नेरने हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीने जागतिक टेनिस क्रमवारीत नोव्हाक जोकोविचला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारा सिन्नेर इटलीचा पहिलाच टेनिसपटू ठरला. या बदलामुळे आता पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत त्याला अव्वल मानांकन असेल. यंदाच्या हंगामात तीन विजेतीपदे सिन्नेरने मिळवली. सिन्नेरने हंगामातील पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. नव्या हंगामात सिन्नेर ३३ लढती जिंकला असून, केवळ तीन लढतीत तो पराभूत झाला आहे. यातील दोन पराभव कार्लोस अल्कराझविरुद्धचे आहेत. फ्रेंच विजेतेपदानंतर अल्कराझचेही मानांकन सुधारले असून, तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. जोकोविच तिसऱ्या स्थानावर घसरला असून, झ्वेरेवचे चौथे स्थान कायम राहिले आहे. महिला क्रमवारीत मोठ्या आघाडीसह अव्वल स्थानावर असलेल्या इगा श्वीऑटेकने सलग तिसऱ्या फ्रेंच विजेतेपदाने हे स्थान कायम राखले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carlos alcaraz admits the challenge of retaining his wimbledon title zws