सिनसिनाटी : चार ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या स्पेनच्या दुसऱ्या मानांकित कार्लोस अल्कराझने सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या गेल मोनफिल्सकडून पराभूत झाल्यानंतर आपला राग रॅकेटवर काढला व त्याला खाली आदळून मोडून टाकले.
मोनफिल्सने तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात अल्कराझला ४-६, ७-६ (७-५), ६-४ असे पराभूत केले. ‘‘माझ्या कारकीर्दीतील हा सर्वात खराब सामना असल्याचे मला वाटले. मी चांगली तयारी केली होती. पण, मला चांगला खेळ करता आला नाही. मी या सामन्याला विसरून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करेन,’’ असे सामना संपल्यानंतर अल्कराझ म्हणाला. सामन्यातील पहिला सेट जिंकत अल्कराझने चांगली सुरुवात केली. मात्र, मोनफिल्सने सलग दोन सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला. २६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिसच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची समजली जाते. या विजयानंतरही मोनफिल्स पुढे चमक दाखवता आली नाही. यानंतरच्या सामन्यात होल्गर रुनने त्याला ३-६, ६-३, ६-४ असे नमवले.
हेही वाचा >>>Samit Dravid : कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’, द्रविडच्या मुलाच्या षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष
महिला गटात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इगा श्वीऑटेकने मार्ता कोस्त्युकला ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अरिना सबालेन्काने एलिना स्वितोलिनावर ७-५, ६-२ असा विजय मिळवला. तर, मीरा अँड्रिवाने फ्रेंच खुली टेनिस व विम्बल्डन स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या जॅस्मीन पाओलिनीला ३-६, ६-३, ६-२ असे नमवले. अन्य सामन्यात अनास्तासिया पाव्लुचेनकोवाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती झेंग किनवेनला ७-५, ६-१ अशा फरकाने पराभूत केले.