विम्बल्डन : सलग पाचव्यांदा आणि एकूण आठव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्यास उत्सुक असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचसमोर रविवारी होणाऱ्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अग्रमानांकित कार्लोस अल्कराझचे आव्हान असेल.
पुरुषांत सर्वाधिक २३ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी जोकोव्हिच आणि टेनिसचे भविष्य म्हणून पाहिले जाणारा २० वर्षीय अल्कराझ यांच्यात गेल्या महिन्यात फ्रेंच खुल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना झाला होता. या सामन्यात जोकोव्हिचने चार सेटमध्ये बाजी मारली आणि पुढे अंतिम सामनाही जिंकत त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे केला.
आता या विक्रमात भर घालण्याची जोकोव्हिचला संधी आहे. मात्र, गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराझला नमवणे सोपे जाणार नाही याची जोकोव्हिचला कल्पना आहे. ‘‘तो कोणत्याही प्रकारच्या टेनिस कोर्टवर, कोणत्याही प्रतिस्पध्र्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्यात सक्षम आहे. तो प्रतिस्पर्धी खेळाडूचे कच्चे दुवे ओळखून त्यानुसार खेळ करतो. तो एक परिपूर्ण खेळाडू आहे,’’ असे अल्कराझबाबत जोकोव्हिच म्हणाला. जोकोव्हिचला अंतिम सामना जिंकण्यात यश आल्यास तो रॉजर फेडररच्या (८) सर्वाधिक विम्बल्डन जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. तसेच विम्बल्डन जिंकणारा तो सर्वात वयस्क खेळाडू ठरेल. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने आठव्या मानांकित यानिक सिन्नेरला ६-३, ६-४, ७-६ (७-४) असे, तर अल्कराझने तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला ६-३, ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली.