न्यूयॉर्क : भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीला अंतिम फेरीतील दुसऱ्या सामन्यातही पराभूत करत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अंतिम फेरीचा निकाल हा चार-चार डावांच्या दोन सामन्यांवर अवलंबून होता. यापैकी पहिला सामना नॉर्वेच्या कार्लसनने २.५-०.५ अशा फरकाने जिंकला होता. त्यामुळे जेतेपदाच्या आशा कायम राखण्यासाठी अर्जुनने दुसरा सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र, कार्लसनपुढे अर्जुनचा निभाव लागला नाही. अंतिम फेरीतील दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव कार्लसनने ४८ चालींमध्ये जिंकला. त्यानंतर दुसऱ्या डावात ५२ चालींमध्ये बाजी मारत कार्लसनने २-० अशी आघाडी घेतली आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
कार्लसनने स्पर्धेत सुरुवातीपासूनच दर्जेदार खेळ केला. त्याने प्राथमिक फेरीत हान्स निमनविरुद्धचा सामना केवळ एका चालीनंतर सोडला. हा त्याचा या स्पर्धेतील एकमेव पराभव होता. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे २९०० टूर रेटिंग गुण मिळवणारा कार्लसन हा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. तसेच अर्जुननेही या स्पर्धेतील यशामुळे आठ खेळाडूंच्या बुद्धिबळ दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी पात्रता मिळवली आहे.