मॅग्नस कार्लसनच्या विश्वविजेतेपदामुळे जागतिक बुद्धिबळातील विश्वनाथन आनंदचे साम्राज्य खालसा झाले असून आता नव्या आधुनिक युगातील कार्लसन पर्वाला सुरुवात झाली आहे. मात्र आनंदने आपल्या पर्वात भारताला बुद्धिबळात यशोशिखरावर पोहोचवले. आनंदच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे देशातील बुद्धिबळ खेळाला चालना मिळाली होती. त्यातूनच आता नवा आनंद निर्माण करण्याची गरज भासू लागली आहे.
बुद्धिबळ हा आपला प्राचीन खेळ असला, तरी या खेळात युग निर्माण करण्याचे श्रेय माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदकडेच जाते. पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवत रशियन देशांची मक्तेदारी त्याने मोडून काढली. मॅग्नस कार्लसन या नॉर्वेच्या खेळाडूने त्याला पराभूत करत एक साम्राज्य खालसा केले अशी प्रतिक्रिया उमटली असली, तरी आनंद पुन्हा विश्वविजेता होऊ शकतो. अर्थात विश्वविजेतेपदासाठी त्याच्यावर अवलंबून न राहता त्याने निर्माण केलेला वारसा पुढे नेण्याची आणि आणखी ‘आनंद’ घडविण्याची जबाबदारी अन्य भारतीय खेळाडूंवर आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीने हुकुमत गाजविणारा खेळाडू भारतात एखादाच घडतो. प्रकाश पदुकोणने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर दहा वर्षांनी पुल्लेला गोपीचंद याच्याद्वारे भारताला ऑल इंग्लंड विजेता खेळाडू मिळाला. त्यांच्या या कामगिरीनंतर अव्वल दर्जाचे यश सायना नेहवालने ऑलिम्पिक कांस्यपदकाद्वारे मिळवून दिले. विक्रमवीर सुनील गावस्कर यांच्याइतकी श्रेष्ठ कामगिरी सचिन तेंडुलकरने केली, मात्र त्याकरिता काही वर्षे वाट पाहावी लागली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात जगावर हुकमत गाजविण्याची क्षमता फक्त आनंदकडेच होती आणि अजूनही राहील. कार्लसनविरुद्धच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीमधील शेवटच्या डावात आनंदने केलेला खेळ लक्षात घेतला, तर अजूनही त्याच्या खेळात अव्वल दर्जा आहे, ही झलक त्याने दाखविली आहे.
१९८० ते १९९० या दशकात आनंद नावाचा सूर्य भारताच्या बुद्धिबळपटावर उगवला आणि खऱ्या अर्थाने भारतात बुद्धिबळाचे युग निर्माण झाले. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याने १९८४मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविला व तेथून सुरू झाली आनंदची दिमाखदार कारकीर्द. कनिष्ठ गटात असूनही त्याने १९८६मध्ये पहिल्यांदाच वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा जिंकून अनेक बुद्धिबळ पंडितांचे अनुमान चुकीचे ठरविले. पाठोपाठ १९८७ व १९८८मध्येही या स्पर्धेचे विजेतेपद मिळवीत आपले पहिले विजेतेपद हा काही चमत्कार नव्हता, हे त्याने सिद्ध केले. १९८७मध्ये आनंदने ग्रँडमास्टर किताब निश्चित केला. हा किताब मिळविणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू होता. या खेळात रशियन खेळाडूंचे वर्चस्व असताना जगज्जेतेपद मिळविणे म्हणजे मृगजळच मानले जात होते; परंतु आनंदने २०००मध्ये पहिल्यांदा विश्वविजेता होण्याची कामगिरी केली आणि बुद्धिबळ पंडितांना धक्का दिला. त्यानंतर त्याने चार वेळा पुन्हा विश्वविजेतेपद मिळवीत भारतीय खेळाडूही या खेळात वर्चस्व गाजवू शकतात, हे दाखवून दिले. भारतात बुद्धिबळाचे विश्वविजेते खेळाडू घडू शकणार नाहीत, ही रशियन बुद्धिबळ पंडितांनी केलेली टीका किती खोटी आहे, हे त्याने दाखवून दिले. आनंदने पहिल्यांदा २०००मध्ये विश्वविजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याने २००७, २००८, २०१०, २०१२ मध्ये विश्वविजेता होण्याचा मान मिळविला.
भारतात वैयक्तिक खेळांबाबत असे दिसून येते, की अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांच्याइतके तुल्यबळ खेळाडू आपल्या देशात सहसा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना परदेशातील स्पर्धामध्ये सतत खेळावे लागते. लिएण्डर पेस, महेश भूपती, सोमदेव देववर्मन, सानिया मिर्झा हे टेनिसपटू तर पारुपल्ली कश्यप व सायना नेहवाल यांच्यासारखे बॅडमिंटनपटू वर्षांतील दहा महिने परदेशातच खेळत असतात. आनंदबाबतही असेच दिसून येते. त्याच्यासारखा जगज्जेता खेळाडू भारतात नसल्यामुळे त्याला युरोपातील स्पर्धामध्येच भाग घ्यावा लागतो.
आजपर्यंत ३०पेक्षा जास्त भारतीय खेळाडूंनी ग्रँडमास्टरचा मान मिळविला आहे, तर आंतरराष्ट्रीय मास्टर किताब आतापर्यंत पाऊणशेपेक्षा जास्त खेळाडूंनी मिळविला आहे. सूर्यशेखर गांगुली, संदीपन चंदा, पी. हरिकृष्ण, कृष्णन शशिकिरण, नीलोत्पल दास, अभिजित कुंटे, अभिजित गुप्ता, सहज ग्रोव्हर, परिमार्जन नेगी, अक्षयराज कोरे यांनी पुरुष विभागात आपल्या कौशल्याचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविला आहे. महिलांमध्येही भारतीय खेळाडूंनी सतत विविध गटांमध्ये आपला अव्वल दर्जा सिद्ध केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या रोहिणी, वासंती व जयश्री खाडिलकर या भगिनी, सुब्रह्मण्यम विजयालक्ष्मी, कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, सौम्या स्वामिनाथन, स्वाती घाटे, मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, तानिया सचदेव, आरती रामस्वामी, ईशा करवडे, मेरी अ‍ॅन गोम्स आदी खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक स्तरावर मानांकन असणे, हीदेखील खेळाडूंसाठी अतिशय अभिमानास्पद कामगिरी असते. आतापर्यंत भारतामधील २५ हजारपेक्षा जास्त खेळाडूंना हे मानांकन लाभले आहे.
आनंदने निर्माण केलेल्या बुद्धिबळ युगामुळे देशात या खेळाबाबत उत्क्रांती झाली. देशात प्रत्येक दिवशी कोठे ना कोठे तरी एखादी स्पर्धा सुरू असते. आपल्या देशात ग्रँडमास्टर्स व आंतरराष्ट्रीय मास्टर्स दर्जाच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. त्यामध्ये परदेशातील अनेक अव्वल दर्जाचे खेळाडूही भाग घेऊ लागले आहेत. बुद्धिबळात करिअर करता येते, हे आनंदने दाखवून दिले आहे. सुदैवाने राष्ट्रीयकृत बँका, पेट्रोलियम कंपन्या, एअर इंडिया आदी कापरेरेट्स संस्थांनी खेळाडूंना नोकरी देत बुद्धिबळ खेळाला चालना दिली आहे. आनंदला कार्लसनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या खेळातील अन्य भारतीय खेळाडूंना प्रायोजकत्वाबाबत अडचण निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर विविध वयोगटांत विजेतेपद मिळविणारे खेळाडू भारतात आणखीही आहेत. आपले मानांकन उंचावण्यासाठी आणि जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धेत आपल्याला कसे स्थान मिळेल, याबाबत भारतीय खेळाडूंनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. भारतात अनेक अनुभवी बुद्धिबळपटू स्पर्धात्मक खेळापेक्षा प्रशिक्षण देण्यावर जास्त लक्ष देतात. आपल्याकडे जागतिक स्पर्धेत चमक दाखविण्याची क्षमता आहे, हे ओळखून या क्षमतेला अधिक वाव त्यांनी दिला पाहिजे. प्रत्येकी वेळी विश्वविजेतेपदासाठी आनंदवर दडपणांचे किती ओझे टाकायचे, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. आनंदने बुद्धिबळाचा फलदायी वृक्ष वाढविला आहे, मात्र तो जतन करण्याची जबाबदारी पुढील पिढीवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा