अन्वय सावंत
मुंबई : एकीकडे अकरावीची परीक्षा आणि दुसरीकडे एका ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्यासह अनेक उत्तमोत्तम बुद्धिबळपटूंशी द्वंद्व. सकाळी पेपर लिहिणे आणि मध्यरात्री उशिरापर्यंत बुद्धिबळ खेळणे अशी दुहेरी कसरत करणारा भारतीय युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद गतसप्ताहात जगभर चर्चेचा विषय होता. अंतिम फेरीत शेवटच्या क्षणी पराभूत झालेल्या प्रज्ञानंदने या वाटचालीत जगज्जेता मॅग्नस कार्लसनलाही धूळ चारली होती. या मातब्बर बुद्धिबळविरुद्ध खेळताना दडपण नसते, असे प्रज्ञानंदने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
कार्लसन सहसा पराभूत होत नाही आणि त्याला चार महिन्यांत दोनदा हरवणारे सापडणे ही दुर्मिळातून दुर्मीळ बाब. पण तो चमत्कार १६ वर्षीय प्रज्ञानंदने करून दाखवला. परीक्षा द्यावी लागली नसती, तर नुकतीच झालेली चेसेबल स्पर्धा जिंकून दाखवली असती, असे तो मोठय़ा विश्वासाने सांगतो.
प्रज्ञानंद गेल्या आठवडय़ात चेसेबल मास्टर्स ऑनलाइन स्पर्धेत उपविजेता ठरला. या स्पर्धेच्या अखेरच्या फेऱ्यांदरम्यान त्याची परीक्षाही सुरू होती. रात्री दोन-तीन वाजता सामने संपल्यावर त्याला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास परीक्षेसाठी महाविद्यालयात हजर राहावे लागत होते. मात्र त्यानंतरही प्रज्ञानंदने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली. त्याने जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या अनिश गिरीला पराभवाचा धक्का दिला. अंतिम फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या िडग लिरेनविरुद्ध झुंजार खेळ केला. या फेरीतील पहिली लढत गमावल्यानंतर प्रज्ञानंदने चार डावांची दुसरी लढत जिंकली. मग टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदने पहिला डाव बरोबरीत सोडवला. दुसऱ्या डावात अखेरच्या काही चालींमध्ये त्याने चुका केल्या आणि याचा फायदा घेत लिरेनने ही स्पर्धा जिंकली.
‘‘अंतिम फेरीत मला अधिक चांगला खेळ करता आला असता. मी ही स्पर्धा जिंकूही शकलो असतो. मात्र या स्पर्धेत खेळणे आणि त्याच वेळी अभ्यासावर लक्ष देणे अवघड होते. पण तरीही या स्पर्धेतील एकंदर कामगिरीबाबत मी समाधानी आहे. माझ्यासाठी ही कामगिरी अनपेक्षित असली, तरी आत्मविश्वास उंचावणारी ठरली आहे. आता आगामी स्पर्धामध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे प्रज्ञानंदने सांगितले.
प्रज्ञानंदने या स्पर्धेपूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या एअरिथग्स मास्टर्स स्पर्धेतही कार्लसनला पराभूत केले होते. काही महिन्यांच्या कालावधीत जगज्जेत्या खेळाडूवर दोन वेळा मात करण्याविषयी विचारले असता प्रज्ञानंद म्हणाला, की मी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा नेहमी प्रयत्न करतो.
आनंद सरांची भूमिका महत्त्वाची!
‘‘माझ्या आजवरच्या यशात विश्वनाथन आनंद सरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यांचे सामने पाहूनही मला खूप काही शिकायला मिळाले आहे. मी त्यांच्याशी कायम संवाद साधत असतो. मला खेळाबाबत काही शंका असल्यास मी त्यांना विचारतो आणि ते या शंका दूर करतात,’’ असे प्रज्ञानंदने नमूद केले. प्रज्ञानंद वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीचा भाग असून तिथे त्याला आनंदसह अन्य नामांकित प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभते.
मायदेशात ऑलिम्पियाड खेळण्यास उत्सुक!
भारताला यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. चेन्नईमध्ये २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रज्ञानंद उत्सुक आहे. ‘‘भारतात आणि विशेषत: चेन्नईत यंदा ऑलिम्पियाड स्पर्धा होणे ही अभिमानास्पद बाब आहे. मी या स्पर्धेत खेळण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेत दर्जेदार कामगिरीचा प्रयत्न असेल,’’ असे प्रज्ञानंद म्हणाला.
मी इतर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळण्यासाठी ज्याप्रकारे तयारी करतो, त्याचप्रमाणे कार्लसनविरुद्ध खेळण्यासाठी करतो. मानसिकदृष्टय़ाही मी फारसे दडपण घेत नाही. माझा केवळ सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न असतो. मी जिंकलो तर उत्तमच, पण पराभूत झालो तरी मला बरेच काही शिकायला मिळते.
– आर. प्रज्ञानंद