ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मरिनचे मत
विजयाची भूक कायम राखणे, ही गोष्ट फारच अवघड आहे. मी आता फक्त २४ वर्षांची आहे. आतापर्यंत मला एकदाही ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्याचबरोबर विश्व अजिंक्यपद, ऑलिम्पिक स्पर्धेत एखादे पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे अजून बरीच स्वप्ने साकार करायची आहेत, असे रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिन मरिनने सांगितले.
बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये हैदराबाद हंटर्स संघाकडून खेळणारी मरिन आपल्या वाटचालीबाबत म्हणाली, ‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी मला अतीव आनंद झाला होता. पण त्यानंतर मला दुखापत झाली. त्यानंतर मी पीबीएल खेळायला आली होती. पण तुम्ही जर अजून एक स्वप्न पाहत असाल तर ती स्वप्नपूर्ती करणे नक्कीच सोपे नाही.’’
मरिनच्या नावावर आतापर्यंत २२ जेतेपदे आहेत. यामध्ये रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा समावेश आहे. त्याचबरोबर २०१४ आणि २०१५मध्ये मरिनने विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही सोनेरी कामगिरी केली होती. युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्णपदक तिच्या नावावर आहेत. सध्याच्या घडीला मरिन जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे, पण नोव्हेंबर २०१६मध्ये ती अव्वल स्थानावर होती.
बॅडमिंटनची फुटबॉलशी तुलना नको!
‘‘काही जण म्हणतात की, या लीगला जास्त लोकप्रियता मिळत नाही. जास्त चाहते येत नाही. माझ्या मते तुम्ही बॅडमिंटनची तुलना फुटबॉलसारख्या खेळाशी करू नये. कारण फुटबॉल हा खेळ म्हणून फारच वेगळा आहे. प्रत्येक खेळाची भिन्न प्रकृती असते. त्यांचे चाहतेही वेगळे असतात. त्यामुळे एका खेळाची दुसऱ्याबरोबर तुलना करणे योग्य नाही,’’ असे मरिनने सांगितले.
विजय कसा मिळाला हे महत्त्वाचे!
‘‘विजय मिळाल्यावर नक्कीच आनंद होतो. पण हा विजय कसा मिळाला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जर मी पराभूत झाली, तर का झाली, त्याची कारणे काय आहेत, हे शोधण्याचा मी प्रयत्न करत असते,’’ असे मरिनने सांगितले.
पीबीएलचे जेतेपद पटकावण्याचे ध्येय!
‘‘बाद फेरीत पोहोचल्याचा आनंद आहेच. लीग सुरू होण्यापूर्वी आम्ही एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवले होते, ते म्हणजे प्रथम उपांत्य फेरी गाठायची. त्यानंतर अंतिम आणि सर्वात मोठे लक्ष्य म्हणजे जेतेपद पटकावण्याचे. आमच्या संघाचा त्या दिशेने प्रवास सुरू आहे. लीगमध्ये प्रत्येक संघ चांगल्या ताकदीचा आहे. त्यांच्याबरोबरचे सामने अटीतटीचे झाले आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी आम्हाला गाफील राहून चालणार नाही. पण घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. संघात चांगले वातावरण आहे. प्रत्येक जण एकमेकांना मदत करत आहे. संघात चांगला समन्वय असल्यामुळेच आतापर्यंत आम्ही जिंकत आलो आहोत,’’ असे मत मरिनने व्यक्त केले.
अव्वल दहा खेळाडू तगडय़ा प्रतिस्पर्धी
माझ्यासाठी अव्वल तीन प्रतिस्पर्धी कोण, असा विचार मी कधीच करत नाही. माझ्या मते क्रमवारीतील अव्वल दहा खेळाडू तगडय़ा प्रतिस्पर्धी आहेत. कारण या अव्वल दहा खेळाडूंबरोबरचा सामना म्हणजे निकराची झुंज असते, असे मरिनने सांगितले.
आता लक्ष्य ऑल इंग्लंड स्पर्धा
* ‘‘सध्याच्या घडीला मी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. कारण हाँगकाँगमध्ये मला दुखापत झाली होती. या दुखापतीतून मी सावरले आहे. आता बॅडमिंटन कोर्टवर उतरल्यावर चांगले वाटत आहे. या लीगमध्ये खेळण्याचा नक्कीच चांगला पाठिंबा मिळत आहे. आता यापुढे माझे ध्येय असेल ते ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा. कारण ही स्पर्धा मला अजूनही जिंकता आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी मी अथक मेहनतही घेत आहे. दुखापतीनंतर कोर्टवर उतरणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सोपे नसते. पण आताच्या घडीला सारे काही आलबेल आहे,’’ असे मरिन म्हणाली.
* आतापर्यंत खेळलेल्या लीगमध्ये पीबीएल ही सर्वात चांगली आहे. कारण या स्पर्धेत जवळपास सर्वच अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे सामनेही चांगले रंगतदार होत आहेत, असे मरिन म्हणाली.