ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना खेळाडूंनी त्यांच्या वजन मर्यादेपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यायला हवी. कोणत्याही परिस्थितीत कुणी याला अपवाद ठरु शकत नाही, अशा शब्दात क्रीडा लवादाने भारताच्या विनेश फोगटची याचिका फेटाळण्यामागील कारण सोमवारी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या दिवशी वजनाच्या बाबतीत असा परिणाम आला तर, तो कठोर मानायला हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजन गटातून खेळताना विनेशने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजनात शंभर ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला अंतिम फेरीसाठी अपात्र धरण्यात आले होते. या निर्णयाविरोधात विनेशने ऑलिम्पिकसाठी नियुक्त केलेल्या हंगामी क्रीडा लवाद समितीकडे याचिका दाखल केली होती. तीनवेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर क्रीडा लवादाने विनेशची याचिका फेटळाल्याचे जाहीर केले. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. क्रीडा लवादाने विनेशचे अपील का फेटाळण्यात आले या संदर्भातील निर्णय प्रकाशित केला.

हेही वाचा : मी अजूनही स्वप्निल कुसळेच!

‘‘वजनगटांच्या स्पर्धेत वजन मर्यादेसंदर्भात तयार केलेले नियम सर्व खेळाडूंसाठी समान आहेत. यासाठी कोणताही अपवाद नाही. आपले वजन मर्यादेपेक्षा कमी राहील याची खात्री करणे ही केवळ खेळाडूची जबाबदारी आहे,’’ असे क्रीडा लवादाने निर्णयात म्हटले आहे. या घटनेत विनेशचे वजन मर्यादेपेक्षा जास्त होते यात प्रश्नच नाही. याचे पुरावे विनेशला स्पष्टपणे आणि थेट सुनावणीच्या दरम्यान सादर केले. तिचे वजन १०० ग्रॅम अधिक भरले होते. हे प्रमाण खूप कमी असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे विनेशचे म्हणणे होते. विशेषत: मासिकपाळीपूर्वीच्या काळात पाणी प्यायल्याने किंवा पाणी शरीरात टिकवून ठेवल्यामुळे असे घडू शकते असा युक्तिवाद करण्यात आला होता.

संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या (युडब्ल्यूडब्ल्यू) नियमानुसार जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत दोन्ही दिवशी वजन अनिवार्य असते. दुसऱ्या दिवशी खेळाडू माघार घेणार असला, तरी त्याला वजन द्यावेच लागते. मानांकन स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन किलो वजनाचा फरक मान्य केला जातो. पण, जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत असे करता येत नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वीच विनेश अपात्र ठरल्यामुळे कुस्ती जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. अव्वल मानांकित युई सुसाकीवर मात केल्यावर तर विनेशलाच संभाव्य विजेती म्हणून गणले जात होते.

हेही वाचा : Vinesh Phogat: विनेशने ऑलिम्पिक जर्सी घालून साजरा केला रक्षाबंधनाचा सण, भावाने भेट म्हणून दिलं ५०० च्या नोटांचं बंडल; पाहा VIDEO

दुसऱ्या दिवशी केलेल्या वजनात आलेले अपयश हे विनेशने केलेल्या एखाद्या बेकायदा किंवा चुकीच्या कृतीमुळे झालेले नसले, तरी त्या अपयशाचा परिणाम हा कठोरच मानला पाहिजे.

डॉ. अॅनाबेल बेनेट, नियुक्त क्रीडा लवाद

क्रीडा लवादाचे निष्कर्ष

● विनेशने स्वेच्छेने ५० किलो वजन गट निवडला

● ५० किलोपेक्षा वजन कमी राखणे हे विनेशला ठाऊक होते

● विनेश अनुभवी कुस्तीगीर आहे. यापूर्वी या नियमातंर्गत विविध स्पर्धा खेळली आहे.

● विनेशला नियमाची पुर्णपणे कल्पना होती.

● खेळाडूला एकाच वजनी गटात सहभाग घेता येतो.

● यामुळे वजन कमी राखण्याची जबाबदारी विनेशचीच राहते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cas explains it was vinesh phogat s responsibility to stay within weight limit css