मुंबई-बंगाल सामना अनिर्णीत; अभिषेक नायरचे सहा बळी

‘कॅचेस विन द मॅचेस’ ही क्रिकेटच्या परंपरेतील जुनी म्हण आहे, पण संपन्न परंपरा लाभलेल्या मुंबईच्या काही युवा खेळाडूंना ही म्हण माहिती नसावी.. आपला स्वप्नवत ‘स्पेल’ टाकून मुंबईला विजयपथावर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिषेक नायरच्या गोलंदाजीवर हातात आलेला झेल क्षेमल वायंगणकरने सोडला अन् मुंबईने हातून सामना गमावला आणि लाजही घालवली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबई बंगालला सर्वबाद करून मोसमातला पहिला सामना जिंकेल आणि सहा गुणांची कमाई करेल, असे वाटत होते. अभिषेक नायरने भन्नाट गोलंदाजी करत अवघ्या १३ धावांत सहा विकेट्सही मिळवले. पण सोडलेले झेल आणि काही विवादास्पद निर्णयामुळे बंगालला सामना अनिर्णीत राखण्यात यश आले आणि मुंबईला तीन गुणांवरच समाधान मानावे लागले.
पहिल्या सत्रात शतकी सलामी देत बंगालने सावध फलंदाजी केली, पण सारे मुख्य गोलंदाज वापरूनही विकेट मिळत नाही हे पाहून कर्णधार रोहितने नायरच्या हाती चेंडू सोपवला आणि उपाहारापूर्वी त्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या सत्रात त्याने कर्णधार मनोज तिवारीसह (१४) तीन फलंदाजांना बाद करत बंगालची दयनीय अवस्था केली. त्यानंतर फक्त साहा हा एकमेव नावाजलेला फलंदाज होता, तो सात धावांवर असताना त्याचा उडालेला झेल क्षेमलने सोडला आणि सामना फिरला. साहाने १५७ चेंडूंत २०७ मिनिटांमध्ये नाबाद ३८ धावांची खेळी साकारली आणि मुंबईच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. यानंतरच्याच षटकात अंकित चव्हाणने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल सोडला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : २९७ आणि ५/२९४ (डाव घोषित)
बंगाल : २०१ आणि ७ बाद १९८ (अरिंदम दास ५४, रोहन बॅनर्जी ५९, वृद्धिमान साहा ३८; अभिषेक नायर ६/१३).     

Story img Loader