क्रीडा क्षेत्रातील सट्टेबाजी, मॅचफिक्सिंग आदी स्वरूपाचे भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.
सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या पाचसहा वर्षांत क्रीडा क्षेत्रातील सट्टेबाजी, मॅचफिक्सिंग व अन्य स्वरूपाचे गैरव्यवहार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका व अन्य काही युरोपियन देशांमध्ये अशा स्वरूपांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत. त्यामुळेच आम्हीही असे पथक स्थापन करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाबरोबर सविस्तर चर्चा केली आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयाची मदत या संदर्भात घेतली जाणार आहे. त्यामुळे असे गैरव्यवहार रोखण्यासाठी एखादा कायदाही या मंत्रालयातर्फे तयार करण्याची शक्यता
आहे.
काही देशांमध्ये अशा स्वरूपाचा कायदा आहे. जर भारतात असा कायदा केला, तर भारताचीही अशा महत्त्वपूर्ण देशांमध्ये गणना केली जाईल. काही कालावधीनंतर आमचे पथक अधिक सक्षम केले जाईल. त्यासाठी क्रीडा क्षेत्रातील सर्वाकडून चांगले सहकार्य मिळण्याची खात्री आहे, असेही सिन्हा म्हणाले.

Story img Loader