कॅरम महासंघाच्या अध्यक्ष आणि सचिव यांची मागणी

कॅरमसारखा खेळ भारताच्या छोटय़ा-छोटय़ा विभागांबरोबर युरोपियन देशांमध्येही प्रसिद्ध होत चालला आहे. आम्ही कॅरमला ऑलिम्पिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पण केंद्र सरकारने आमच्या खेळाला प्राधान्य देण्याची गरज आहे. आम्ही त्यांच्या निकषांमध्ये बसूनही आम्हाला अजूनही कोणतीही सुविधा दिलेली नाही. त्यांनी जर सुविधा दिल्या तर आमचे मनोबल उंचावेल आणि भारताची जगभरातील मक्तेदारी वाढेल, असे मत अखिल भारतीय कॅरम संघटनेचे अध्यक्ष रकिबूल हुसेन आणि सचिव व्ही. डी. नारायण यांनी व्यक्त केले.

‘‘पूर्वी केंद्र शासनाने अ, ब, क या श्रेणींनुसार खेळांची विभागणी केली होती. पण आता प्राधान्य आणि अन्य असे दोन गट करण्यात आले आहेत. अन्य प्रकारातून प्राधान्य गटामध्ये यायला सरकारचे काही निकष आहेत. त्यामधील महत्त्वाचा निकष म्हणजे खेळाचा देशातील प्रसार आणि या खेळाने देशाला किती पदके जिंकवून दिली आहे, असे आहेत. कॅरमचा प्रसार प्रत्येक गावामध्ये झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅरमने आतापर्यंत सातत्याने देशाला पदके जिंकवून दिली आहेत. त्यानुसार कॅरमला सरकारने प्राधान्य गटामध्ये स्थान द्यायला हवे, पण तसे झालेले नाही. त्यामुळे आम्ही केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांची लवकरच भेट घेणार आहोत,’’ असे सचिव नारायण यांनी सांगितले.

सरकारकडून कॅरमकडे दुर्लक्ष कसे होते आहे, याचे अजून एक उदाहरण हुसेन यांनी दिले. ते म्हणाले की, ‘‘दिल्लीमधील इंधिरा गांधी स्टेडियममध्ये कॅरमसाठी जागा देण्याचे ठरले होते. राष्ट्रकुल स्पर्धेच्यावेळी स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम सुरु होते. त्यानंतर मात्र आम्हाला सरकारने जागा देण्याचे टाळले. आमची जागा अन्य खेळाला दिली. आता जागा देण्याचे त्यांनी सांगितले असले तरी जागेचे भाव जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला प्राधान्य गटात घ्यावे आणि खेळाच्या विकासासाठी चांगली जागा द्यावी, ही आमची मागणी असेल.’’

काही वर्षांमध्येच ऑलिम्पिक प्रवेश

‘‘ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचा खेळ किती देशांमध्ये आणि कोणत्या स्तरावर खेळला जातो, हे महत्वाचे असते. सध्याच्या घडीला जवळपास २५ देश कॅरम खेळत आहेत. ही देशांची संख्या आम्हाला ४०वर न्यायची आहे. यापूर्वी अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये कॅरमचे प्रदर्शनीय सामने खेळवले गेले होते, त्यामुळे ऑलिम्पिकसाठी कॅरम हा नवीन खेळ नाही. लवकरच कॅरम ऑलिम्पिकमध्ये दिसेल,’’ असे नारायण म्हणाले.

कॅरमची लीगही लवकरच दिसेल

‘‘आतापर्यंत बऱ्याच खेळांच्या लीग आपण पाहिल्या आहेत, त्याचप्रमाणे कॅरमची लीगही येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक लीगमुळे खेळाचा दर्जा आणि खेळाडूंची संख्या वाढताना पाहायला मिळते, तसे कॅरमच्या बाब तीततही पाहायला मिळेल. लीगसाठी खेळात काही बदल करायचे असतील, तर ते करायला आम्ही तयार आहोत,’’ असे हुसेन म्हणाले.

आता युरोपियन देशांमध्ये खेळणार

‘‘कॅरमचा प्रसार करण्यासाठी आम्ही अन्य देशांबरोबर मैत्रीपूर्ण सामने खेळतो. काही दिवसांपूर्वी आम्ही मालदिवबरोबर सामने खेळलो. आता पुढील काही दिवसांमध्ये आम्ही युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहोत. युरोपमध्ये आम्ही कॅरमचा प्रसार करण्यात यशस्वी झालो, तर त्याचा फायदा ऑलिम्पिक प्रवेशसाठीही होईल,’’ असे नारायण यांनी सांगितले.

महाराष्ट्राला कॅरमची परंपरा

‘‘कॅरम या खेळाची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. मी जेव्हा १९७६-७७ साली मुंबईत उपकनिष्ठ स्पर्धा खेळायला आलो होतो, तेव्हाही महाराष्ट्रात चांगले कॅरम खेळले जायचे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे कॅरममधील एक अग्रेसर राज्य आहे,’’ असे हुसेन म्हणाले.

Story img Loader