इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी मालिका
कर्णधार जो रूट (नाबाद ११४) आणि प्रतिभावान सलामीवीर रॉरी बर्न्स (१०१) या दोघांनी साकारलेल्या झुंजार शतकांमुळे इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केले. परंतु तिसऱ्या दिवसअखेरीस न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडची ५ बाद २६९ धावा अशी अवस्था केली असून यजमानांकडे अद्यापही १०६ धावांची आघाडी आहे.
शनिवारच्या २ बाद ३९ धावांवरून पुढे खेळताना रूट आणि बर्न्स यांनी संथगतीने फलंदाजी केली. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी तब्बल ६३ षटकांत १७७ धावांची भागीदारी रचली. त्यांनी पहिल्या दोन्ही सत्रांत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मात्र कारकीर्दीतील दुसरे शतक साकारून बर्न्स दुर्दैवीरीत्या धावचीत झाला आणि तेथून इंग्लंडचा डाव घसरला.
बेन स्टोक्स (२६), पदार्पणवीर झ्ॉक क्रॉवली (१) लवकर माघारी परतले. परंतु २८ वर्षीय रूटने तब्बल नऊ महिन्यांनंतर कसोटी कारकीर्दीतील १७ वे शतक झळकावताना एक बाजू लावून धरत संपूर्ण दिवस खेळून काढला. दिवसअखेरीस १४ चौकारांसह रूट ११४, तर यष्टिरक्षक ऑलिव्हर पोप ४ धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे टिम साऊदीने सर्वाधिक दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
* न्यूझीलंड (पहिला डाव) : सर्व बाद ३७५
* इंग्लंड (पहिला डाव) : ९९.४ षटकांत ५ बाद २६९ (जो रूट खेळत आहे ११४, रॉरी बर्न्स १०१; टिम साऊदी २/६३)