सलामीवीर हर्षद खडीवाले याचे शतक हुकले, मात्र त्याने अंकित बावणे याच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्रास रणजी करंडक क्रिकेट सामन्यात दिल्लीपुढे विजयासाठी २७० धावांचे आव्हान ठेवता आले.
उसळत्या गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर महाराष्ट्राने पहिल्या डावातील तीन धावांच्या नाममात्र आघाडीनंतर दुसऱ्या डावात २६६ धावांची मजल गाठली. त्याचे मुख्य श्रेय खडीवाले (९६) व बावणे (५५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १३० धावांच्या भागीदारीस द्यावे लागेल. त्यानंतर चिराग खुराणा (३८) व श्रीकांत मुंढे (३३) यांनी सातव्या विकेटसाठी ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हे चारच फलंदाज महाराष्ट्राकडून दोन आकडी धावा करु शकले. अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
महाराष्ट्राने बिनबाद ३ धावांवर दुसरा डाव पुढे सुरु केला, मात्र विराग आवटे (३) व संग्राम अतितकर (०) यांच्या विकेट्स महाराष्ट्राने लागोपाठ गमावल्यामुळे महाराष्ट्राची २ बाद २२ अशी स्थिती झाली. खडीवाले व बावणे यांनी दिल्लीच्या संमिश्र माऱ्यास आत्मविश्वासाने तोंड देत संघाचा डाव सावरला. त्यांनी १६८ मिनिटांत १३० धावांची भर घातली. बावणे याने ११ चौकारांसह ५५ धावा केल्या. तो बाद झाल्यावर पुन्हा महाराष्ट्राचा डाव घसरला. त्यांनी कर्णधार रोहित मोटवानी (९), केदार जाधव (०) यांच्याही विकेट्स गमावल्या. एका बाजूने झुंजार फलंदाजी करणारा खडीवाले हा शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच विकास टोकस याने त्याचा त्रिफळा उडविला. खडीवाले याने २८६ मिनिटांच्या खेळात १२ चौकारांसह ९६ धावा केल्या. महाराष्ट्राची ही घसरगुंडी खुराणा व मुंढे यांनी रोखली. त्यांनी दमदार खेळ करीत ६७ धावांची भर घातली. खुराणा याने तीन चौकारांसह ३८ धावा केल्या तर मुंढे याने चार चौकारांसह ३३ धावा केल्या. दिल्लीकडून सुमित नरवाल व प्रदीप संगवान यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले, तर विकास टोकस व पवन सुयाल यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. मंगळवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. खेळपट्टी गोलंदाजांना पोषक असल्यामुळे दिल्लीस २७० धावांचे आव्हानही कठीण होणार आहे. निर्णायक विजयासाठी महाराष्ट्रास दिल्लीचा दुसरा डाव गुंडाळणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा