आपल्या संयमी खेळाच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणून भारतीयांना ‘दीवाने’ बनवले ते हरयाणाचा सलामीवीर राहुल दिवानने. त्याच्या नाबाद १४४ धावांच्या खेळीच्या जोरावरच हरयाणाला पहिल्या डावात ३३३ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला त्यांच्या सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली असून तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी बिनबाद ११८ अशी मजल मारली आहे.
तिसऱ्या दिवशी दिवानचा काटा काढायचा, हे ध्येय मनाशी ठेवून इंग्लंडचे गोलंदाज उतरले खरे, पण दिवानच्या अभेद्य बचावापुढे इंग्लंडच्या गोलंदाजांची डाळ शिजली नाही. शांत, संयमी, बचावात्मक नाबाद शतकी खेळी साकारत त्याने इंग्लंडची गोलंदाजी उघडय़ावर पाडली. दिवानने उपाहरापूर्वीच शतक झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजांना सज्जड इशारा दिला. दिवानने २५० मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकत, तब्बल ३२० चेंडूंचा सामना करीत १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १४४ धावांची खेळी साकारली. ही खेळी साकारताना त्याने फक्त स्वत:चे शतक कसे होईल हे पाहिले नाही, तर संघावर फॉलोऑनची आपत्ती येणार नाही, याचीही काळजी घेतली. त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्यानेच हरयाणाला ३३३ धावांवर समाधान मानावे लागले. इंग्लंडकडून टीम ब्रेसनन आणि स्टुअर्ट मीकर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला भक्कम पायाभरणी करून दिली ती निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉट या दोन्ही सलामीवीरांनी. या दोघांनी हरयाणाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत ११८ धावांची सलामी दिली. कॉम्प्टनने या वेळी १११ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी साकारली, तर ट्रॉटने ११७ चेंडूंचा सामना करीत १० चौकारांनिशी नाबाद ६१ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ५२१
हरयाणा (पहिला डाव) : ११३.४ षटकांत सर्व बाद ३३३
(राहुल दिवान नाबाद १४४; टीम ब्रेसनन ३/६७)
इंग्लंड (दुसरा डाव) : ३८ षटकांत बिनबाद ११८
(निक कॉम्प्टन खेळत आहे ५४, जोनाथन ट्रॉट खेळत आहे ६१).
दिवान ने दीवाना बना दिया
आपल्या संयमी खेळाच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणून भारतीयांना ‘दीवाने’ बनवले ते हरयाणाचा सलामीवीर राहुल दिवानने.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-11-2012 at 01:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Century of diwan