पुणे : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) सध्या सुरू असलेल्या संघर्षात अध्यक्ष पी. टी. उषा यांच्यासमोरील आव्हाने आता अधिक कठीण होऊन बसली आहेत. उषा यांच्याविरोधात असलेल्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी थेट विशेष सर्वसाधारण सभा बोलावली असून, या सभेत उषा यांना अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.

‘आयओए’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यावरून सुरू झालेला वाद आता पराकोटीला पोहोचला असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) त्यांचा ऑलिम्पिक निधीही रोखला आहे. याचे पडसाद उमटले असून, उषा यांना विरोध करणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी थेट विशेष सर्वसाधारण सभेची घोषणा केली आहे. २५ ऑक्टोबरला भारतीय ऑलिम्पिक भवनात ही सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा अध्यक्ष उषा यांनी ३१ डिसेंबर २०२३ मध्येच बोलावणे अपेक्षित होते. ती त्यांच्याकडून घेण्यात न आल्यामुळे कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी उचललेल्या पावलाला वेगळे महत्त्व मिळते. रघुराम अय्यर यांच्या नियुक्तीला विरोध करून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची तात्पुरती जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘आयओए’ सचिव कल्याण चौबे यांच्या स्वाक्षरीने सभेची नोटीस काढण्यात आली असून, हे पत्र ‘लोकसत्ता’च्या हाती आहे.

हेही वाचा >>>IND vs NZ: “DSP आहे आता तो…”, मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे लाईव्ह सामन्यातच भिडले, सुनील गावसकरांच्या वाक्याने वेधलं लक्ष

यापूर्वीच्या बैठकीत कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी रघुराम अय्यर यांची नियुक्ती स्वीकारण्यास नकार दिल्यापासून ‘आयओए’मध्ये उषा विरुद्ध कार्यकारी परिषद सदस्य असे थेट दोन गट पडले होते. कार्यकारी परिषदेतील १२ सदस्य उषा यांच्याविरोधात आहेत. यात दोनच दिवसांपूर्वी खेळाडू समितीच्या अध्यक्ष मेरी कोम यांची भर पडली आहे.