अव्वल खेळाडू राडामेल फलकाव याला जबरदस्तीने विकावे लागल्यानंतर कर्जाचा डोंगर कमी झाल्यामुळे अॅटलेटिको माद्रिदने वर्षभरात दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत बार्सिलोनासारख्या बलाढय़ संघाला पराभवाचा धक्का देत चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अॅटलेटिको माद्रिद उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या गतविजेत्या बायर्न म्युनिकने मँचेस्टर युनायटेडचा ३-१ असा पराभव करीत विजयी घोडदौड कायम राखली.
कोके याच्या गोलमुळे अॅटलेटिको माद्रिदने बार्सिलोनाचा १-० असा पराभव केला. पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यामुळे स्पॅनिश लीगमध्ये आघाडीवर असलेल्या अॅटलेटिको माद्रिदने २-१ अशा गोलफरकासह आगेकूच केली. बायर्न म्युनिकने ४-२ अशा गोलफरकासह कूच करीत जेतेपद राखण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. अॅटलेटिको माद्रिद, बायर्न म्युनिक, चेल्सी आणि रिअल माद्रिद यांच्यात उपांत्य फेरीसाठीचे वेळापत्रक शुक्रवारी ठरणार आहे.
कोके याने पाचव्या मिनिटालाच गोल करून अॅटलेटिको माद्रिदला आघाडीवर आणले होते. डेव्हिड व्हिलाचे गोल करण्याचे प्रयत्न दोन वेळा धुडकावून लावले, अन्यथा अॅटलेटिको संघाने २-० अशी आघाडी घेतली असती. बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीला अॅटलेटिकोविरुद्धच्या सलग सहाव्या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही.
बायर्न म्युनिकने मँचेस्टर युनायटेडवर ३-१ असा विजय साकारत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली आहे. बायर्न म्युनिकने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले. अखेर पॅट्रिस एव्हराने ५७व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडसाठी गोल करीत कोंडी फोडली. दोन मिनिटांनंतर मारिओ मान्झुकिकने गोल लगावत बायर्न म्युनिकला बरोबरी साधून दिली. थॉमस म्युलर (६८व्या मिनिटाला) आणि आर्येन रॉबेन (७६व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एका गोलाची भर घालत बायर्न म्युनिकच्या विजयावर मोहोर उमटवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा