Champions League Football लंडन : रहीम स्टर्लिग आणि काय हावेट्झ या आक्रमकपटूंनी केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात बुरुसिया डॉर्टमंडवर २-० असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. चेल्सीचा संघ पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर ०-१ असा पिछाडीवर होता. मात्र, दोन सामन्यांनंतर चेल्सीने २-१ अशा एकूण फरकासह आगेकूच केली.
सामन्याच्या सुरुवातीला डॉर्टमंडच्या बचावफळीने चेल्सीवर दडपण निर्माण केले. ४२व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, ४३व्या मिनिटाला स्टर्लिगने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत चेल्सीकडे ही आघाडी कायम होती. दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला चेल्सीला पेनल्टी मिळाली. यावर हावेट्झला गोल करण्यात अपयश आले. मात्र, त्याने पेनल्टी मारण्यापूर्वीच दोन्ही संघांच्या काही खेळाडूंनी गोलकक्षात प्रवेश केल्याचे पंचांच्या निदर्शनास आल्याने हावेट्झला पुन्हा पेनल्टी मारण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने कोणतीही चूक न करता चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. चेल्सीने मग भक्कम बचाव करताना विजय मिळवला आणि पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.