तीन गोलांच्या पिछाडीनंतरही उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ४-० असा विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिव्हरपूल : चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ३-० असा विजय मिळवूनही पराभवाचा सामना करावा लागेल, असे बार्सिलोनाला स्वप्नातही वाटले नसावे. पण लिव्हरपूलने झुंझार कामगिरी करत दुसऱ्या सामन्यात ४-० असा विजय मिळवून चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आणि फुटबॉलविश्वाला आश्चर्याचा धक्काच दिला.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तीन गोलने पिछाडीवर पडूनही अंतिम फेरी गाठणारा लिव्हरपूल हा तिसरा संघ ठरला आहे. दुसऱ्या सामन्यात बार्सिलोनावर चार गोल लगावणाऱ्या लिव्हरपूलने ४-३ अशा एकूण गोलफरकाच्या आधारावर सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मोहम्मद सलाह आणि रॉबेटरे फिरमिनो या आक्रमकवीरांच्या अनुपस्थितीतही लिव्हरपूलने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात दणक्यात पुनरागमन करून बार्सिलोनासारख्या बलाढय़ संघाला पराभवाचा धक्का दिला आहे.

डिवॉक ओरिगीने सातव्या मिनिटालाच गोल झळकावत लिव्हरपूलच्या आशा उंचावल्या. मध्यंतरानंतर जॉर्जिनियो विजनालडम याने ५४व्या मिनिटाला धिम्या गतीच्या फटक्यासह बार्सिलोनाचा गोलरक्षक मार्क-आंद्रे टेर स्टेगन याला चकवत लिव्हरपूलसाठी दुसरा गोल केला. त्यानंतर दोन मिनिटांनी शेरडन शाकिरीच्या क्रॉसवर विजनालडमने हेडरद्वारे गोल करत लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली. ७९व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांडर-आरनॉल्डने सुरेख कामगिरी करत बार्सिलोनाच्या बचावपटूंची फळी भेदली आणि चेंडू ओरिगीकडे सोपवला. ओरिगीने कोणतीही चूक न करता लिव्हरपूलसाठी चौथा गोल लगावला आणि अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. आता लिव्हरपूलला १ जून रोजी माद्रिद येथे रंगणाऱ्या अंतिम फेरीत आयएक्स आणि टॉटेनहॅम यांच्यातील विजेत्याशी झुंजावे लागेल.

लिव्हरपूलचे आक्रमण थोपवण्यासाठी बार्सिलोनाच्या खेळाडूंकडे कोणतेही उत्तर नव्हते. लिओनेल मेसी, लुइस सुआरेझसारखे खेळाडू लिव्हरपूलच्या झंझावातापुढे निरुत्तर ठरले. धष्टपुष्ट ओरिगीच्या आक्रमणाचा सामना करताना बार्सिलोनाला आपला खेळ उंचावता आला नाही. मध्यंतरानंतर विजनालडमने १२० सेकंदांच्या आत दोन गोल केल्यानंतर बार्सिलोनावरील दबाव आणखीनच वाढला होता. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात ४-१ अशी आघाडी घेऊनही बार्सिलोनाला रोमाकडून पराभूत व्हावे लागले होते.

लिव्हरपूलच्या झुंझार वृत्तीपुढे बार्सिलोनाचे खेळाडू अपयशी ठरले. मध्यंतरानंतर दोन मिनिटांत दोन गोल स्वीकारावे लागल्यानंतर आम्ही सामना हातातून गमावला. आमच्यासाठी आणि आमच्या चाहत्यांसाठी हा निकाल धक्कादायक आहे. मात्र लिव्हरपूलला दमदार कामगिरीचे श्रेय द्यावेच लागेल. त्यांनी दमदार कामगिरी करत सुरुवातीपासूनच आमच्यावर वर्चस्व गाजवले. लिव्हरपूलच्या आक्रमणाला आमच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. या पराभवाची सर्व जबाबदारी प्रशिक्षक या नात्याने मी स्वीकारली आहे. सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला आघाडीनंतरही माघारी परतावे लागत आहे, हे वेदनादायी आहे.

– इर्नेस्टो वाल्वेर्डे, बार्सिलोनाचे प्रशिक्षक

चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत नवव्यांदा धडक मारण्याची कामगिरी लिव्हरपूलने केली आहे. रेयाल माद्रिदने १६ वेळा, एसी मिलानने ११ वेळा तर बायर्न म्युनिकने १० वेळा अंतिम फेरी गाठण्याची करामत केली आहे.

चॅम्पियन्स लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा लिव्हरपूल हा दुसरा इंग्लिश संघ ठरला आहे. याआधी मँचेस्टर युनायटेडने २००८ आणि २००९ मध्ये ही किमया करून दाखवली आहे.

चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत तीन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतरही एखाद्या संघाने आगेकूच करण्याची ही चौथी वेळ आहे. आघाडी घेऊनही पराभूत होणाऱ्या संघांमध्ये बार्सिलोनाची ही तिसरी वेळ आहे.

चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाने धडक मारलेल्या गेल्या चार उपांत्य फेरीमध्ये तिसऱ्यांदा पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आहे. २००५ मध्ये त्यांनी अखेरचे जेतेपद पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions league football liverpool stun barcelona
Show comments