एपी, माद्रिद : रेयाल माद्रिद संघाची हार न मानण्याची वृत्ती चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील लढतीदरम्यान पुन्हा एकदा दिसून आली. रेयालने पिछाडीनंतरही दोन टप्प्यांतील लढतीअंती मँचेस्टर सिटीवर एकूण ६-५ अशा गोलफरकाने मात करत तब्बल १७व्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.
सिटीच्या घरच्या मैदानावर झालेला उपांत्य फेरीचा पहिला टप्प्यातील सामना यजमानांनी ४-३ असा जिंकला होता. तसेच माद्रिदच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यातील जवळपास ८९ मिनिटे सिटीने वर्चस्व गाजवले. रियाद महारेझने (७३वे मिनिट) केलेल्या गोलमुळे सिटीला या सामन्यात १-० अशी, तर एकूण लढतीत ५-३ अशी आघाडी मिळाली.
सिटीचा संघ या स्पर्धेत आगेकूच करणार असे वाटत असतानाच ९०वे मिनिट आणि त्यानंतरच्या भरपाई वेळेत राखीव फळीतील रॉड्रिगोने गोल करत रेयालला या सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तसेच एकूण लढतीत ५-५ अशी बरोबरी झाल्याने ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ खेळवण्यात आला. यात सिटीचा बचावपटू रुबेन डियाजने तारांकित आघाडीपटू करीम बेन्झेमाला पेनल्टी भागामध्ये अयोग्यरीत्या पाडल्याने रेयालला पेनल्टी मिळाली. बेन्झेमाने (९५वे मिनिट) यावर स्वत:च गोल करत रेयालला दुसऱ्या टप्प्यातील सामना ३-१ असा, तर एकूण लढत ६-५ अशी जिंकवून दिली.
रेयालने यंदा उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीतही अनुक्रमे पॅरिस सेंट-जर्मेन आणि चेल्सी यांच्यावर पिछाडीवरून विजय प्राप्त केले होते. उपांत्य फेरीत सिटीविरुद्धही त्यांना मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात यश आले. मात्र, सिटीचे पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. गेल्या वर्षी अंतिम फेरीत त्यांना चेल्सीकडून पराभव पत्करावा लागला होता.
अंतिम फेरीत लिव्हरपूलचे आव्हान
चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात रेयाल माद्रिदपुढे लिव्हरपूलचे आव्हान असेल. हा सामना २८ मे रोजी पॅरिस येथे खेळवला जाणार आहे. २०१८च्या अंतिम सामन्यात हेच दोन संघ आमनेसामने आले होते आणि त्या वेळी रेयालने ३-१ अशी बाजी मारत विक्रमी १३व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. आता लिव्हरपूलला त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे.