ख्रिस्तियानो रोनाल्डो नावाचे वादळ या वर्षी जोराने घोंघावू लागले आहे. रोनाल्डोने आपल्यातील अद्भुत कौशल्याच्या जोरावर रिअल माद्रिदला या वर्षी ला लीगा, चॅम्पियन्स लीग, लीग चषक अशा अनेक स्पर्धाच्या जेतेपदाची स्वप्ने दाखवली आहेत. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही रोनाल्डोचा ‘रिअल’ धमाका पाहायला मिळाला. त्याने केलेल्या दोन गोलांच्या बळावर बार्सिलोनाने शाल्के संघावर ३-१ असा विजय मिळवत ९-२ अशा गोलफरकासह चॅम्पियन्स लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठली. चेल्सीनेही गलाटासारे संघाचा पाडाव करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले.
गॅरेथ बॅलेच्या क्रॉसवर रोनाल्डोने २१व्या मिनिटाला गोल करत रिअल माद्रिदला खाते उघडून दिले. मात्र त्यानंतर १० मिनिटांनी टिम होगलँड याने गोल करत शाल्केला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दोन मिनिटांच्या फरकाने दोन गोल करत रिअल माद्रिदने विजयावर नाव कोरले. रोनाल्डोने ७३व्या मिनिटाला बॅलेकडून मिळालेल्या पासवर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत चॅम्पियन्स लीगच्या या मोसमातील १३व्या गोलाची नोंद केली. त्यानंतर बॅलेने तिसरा गोल रचण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने दिलेल्या पासवर या वेळी ७५व्या मिनिटाला अल्वारो मोराटा याने गोल केला.
सॅम्युएल इटो आणि गॅरी काहिल यांनी केलेल्या गोलमुळे चेल्सीने गालाटासारे संघावर २-० असा विजय मिळवून ३-१ अशा गोलफरकानिशी उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्याच मिनिटाला सॅम्युएल इटोने गोल करून चेल्सीला आघाडीवर आणले. पहिले सत्र संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गॅरी काहिलने आणखी एका गोलाची भर घालत चेल्सीला मोठी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी चेल्सीला आगेकूच करण्यासाठी पुरेशी ठरली. ‘‘गेल्या वर्षी चेल्सीने युरोपा लीग स्पर्धा जिंकली, त्या वेळी आमचा खेळ वेगळ्यात स्तरावर पोहोचला होता. पण या वेळी चॅम्पियन्स लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आम्ही जगातील सर्वोत्तम आठ संघांमध्ये स्थान मिळवले,’’ असे चेल्सीचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी सांगितले.