गॅरेथ बॅले, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि करिम बेन्झामा या त्रिकुटाच्या दुहेरी धमाक्याच्या जोरावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शेल्कवर दणदणीत विजय मिळवला. या दिमाखदार विजयासह रिअल माद्रिदने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले आहे. कालरे अ‍ॅनकलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या रिअल माद्रिदच्या संघाने सलग २७ लढतीत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. या विजयासह रिअल माद्रिदने जर्मनीतील मैदानावरील साधारण कामगिरीची परंपरा मोडीत काढली. जर्मनीत खेळलेल्या २६ सामन्यांमधील रिअलचा हा केवळ दुसरा विजय आहे.
१३व्या मिनिटाला बॅलेने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर चेंडू रोनाल्डोकडे सोपवला. रोनाल्डोने शेल्कच्या बचावपटूंना भेदत चेंडू बेन्झामाकडे दिला आणि त्याने झटपट गोल करत रिअलचे खाते उघडले. पुढच्याच मिनिटाला बरोबरी करण्याची संधी शेल्कच्या मॅक्स मेयरने वाया घालवली. त्याने केलेला प्रयत्न गोलपोस्टच्या वरून गेला. गॅरेथ बॅलेने २१व्या मिनिटाला शेल्कच्या बचावपटूंना मागे सारत शानदार गोल केला. मध्यंतराला पिछाडीवर पडलेल्या शेल्कने दुसऱ्या सत्रात जोरदार आक्रमण केले मात्र रिअलच्या खेळाडूंनी चिवट खेळ करत त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. रोनाल्डोने सुरेख गोल करत रिअलची आघाडी वाढवली. पाचच मिनिटांत रोनाल्डोच्या पासचा अचूक उपयोग करत बेन्झामाने आणखी एक गोल केला. भक्कम आघाडी मिळवलेल्या रिअलतर्फे बॅलेने गोल करत वर्चस्व राखले. अनुभवी रोनाल्डोने गोलमहोत्सवी संध्याकाळ साजरी करत आणखी एक गोल केला. यंदाच्या हंगामात रिअलतर्फे रोनाल्डोचा ३६ सामन्यांमधील ३३वा गोल ठरला. अतिरिक्त वेळेत लास जॅन हुनटेलेअरने शेल्ककडून एकमेव गोल केला. पुढच्या लढतीत रिअल माद्रिदसमोर बायर्न म्युनिकसारख्या दमदार संघाचे आव्हान असणार आहे.