फुटबॉलच्या क्षितिजावरील नवा तारा नेयमारने बार्सिलोनाकडून पहिली हॅट्ट्रिक बुधवारी साजरी केली. नेयमारच्या या कामगिरीमुळे बार्सिलोनाने सेल्टिक फुटबॉल क्लबचा ६-१ असा धुव्वा उडवून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ह-गटात १३ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
गेरार्ड पिकने ७व्या मिनिटाला गोलक्षेत्राच्या जवळून सेल्टिकचा गोलरक्षक फ्रेसर फोस्टर याला चकवून पहिला गोल करत यजमान बार्सिलोनाला दमदार सुरुवात करून दिली.
प्रेडो रॉड्रिग्जने ४०व्या मिनिटाला दुसऱ्या गोलाची भर घातली. त्यानंतर नेयमारचा करिश्मा पाहायला मिळाला. नेयमारने १४ मिनिटांच्या अंतराने लागोपाठ तीन गोल झळकावले. पहिले सत्र संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना नेयमारने बार्सिलोनाला ३-० असे आघाडीवर आणले.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच झावीबरोबर सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करून नेयमारने दुसरा गोल लगावला. १० मिनिटांनंतर आपल्या सुरेख कौशल्याचे प्रदर्शन करत त्याने हॅट्ट्रिक केली. ख्रिस्तियान टेलोने ७२व्या मिनिटाला आणखी एक गोलाची भर घालत बार्सिलोनासाठी गोलांचा ‘षटकार’ लगावला. ८८व्या मिनिटाला सेल्टिककडून जॉर्जियस समारस याने एकमेव गोल नोंदवला.
ब-गटात नापोली संघाने अर्सेनलचा २-० असा पराभव केला, पण त्यांना बाद फेरीत मजल मारण्यात अपयश आले. ब गटात बोरूसिया डॉर्टमंड, अर्सेनल आणि नापोली या संघांचे प्रत्येकी १२ गुण झाले. पण गोलफरकाच्या आधारावर बोरूसिया डॉर्टमंड व अर्सेनल या संघांनी आगेकूच केली. नापोलीकडून गोन्झालो हिग्युएन आणि जोल कॅलेजॉन यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. ई गटात चेल्सीने स्टेअुआ संघाचा १-० असा पराभव करत अव्वल स्थान प्राप्त केले.

Story img Loader