लिओनेल मेस्सीने केलेल्या गोलच्या जोरावर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने एसी मिलानशी १-१ अशी बरोबरी साधली. अन्य लढतीत बोरूसिया डॉर्टमंडने अर्सेनलचा निर्विवाद विजयवारू रोखत त्यांच्यावर २-१ अशी मात केली. दिएगो कोस्टाच्या शानदार कामगिरीच्या आधारे अॅटलेटिको माद्रिदने ऑस्ट्रिया व्हिएन्नाचा ३-० असा धुव्वा उडवला. चेल्सीने शेल्केवर ३-० अशी मात केली.
दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या मेस्सीने गोलक्षेत्राच्या जवळून अचूकपणे गोल करत बार्सिलोनाला बरोबरी करून दिली. त्याआधी नवव्या मिनिटाला मिलानतर्फे रॉबिन्होने झटपट गोल केला होता. बरोबरीनंतर दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. या बरोबरीसह बार्सिलोनाने ‘एच’ गटात सात गुणांसह अव्वल स्थान राखले आहे.
रॉबर्ट लेवानडोव्हस्कीने शेवटच्या मिनिटांत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर बोरूसिया डॉर्टमंडने अर्सेनलवर खळबळजनक विजय मिळवला. १६व्या मिनिटाला हेन्रिख खितारायनने गोल करत बोरूसियाचे खाते उघडले. ४१व्या मिनिटाला ऑलिव्हर गिरोडने सुरेख गोल करत अर्सेनलला बरोबरी साधून दिली. सामना बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच लेवानडोव्हस्कीने ८२व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
फर्नाडो टोरेसने दोन गोल करत चेल्सीला शेल्केवर ३-० असा सहज विजय मिळवून दिला. टोरेसने पाचव्या आणि ६८व्या मिनिटाला गोल केले. सामना संपायला काही मिनिटे असताना ईडन हझार्डने गोल केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2013 रोजी प्रकाशित
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बार्सिलोनाची मिलानशी बरोबरी
लिओनेल मेस्सीने केलेल्या गोलच्या जोरावर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने एसी मिलानशी १-१ अशी बरोबरी साधली.

First published on: 24-10-2013 at 04:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions league round up messi rescues barcelona