जून महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ सहभागी होणार हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता भारत विरुद्ध पाकिस्तान या रोमांचक लढतीकडे असणार आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ आजवर पाकिस्तानवर नेहमी वरचढ राहिला आहे. ४ जून रोजी भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तानसोबत रंगणार आहे. या लढतीबाबत वातावरण निर्मीती होण्यासही आता सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा पाक निवड समितीचा मुख्य इंजमाम उल हकने यंदा पाकिस्तानचा संघ भारताला लोळवणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करून वातावरण तापवण्याचे काम केले आहे.

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानची भारतीय संघाविरुद्धची कामगिरी आजवर चांगली राहिली नसली तरी प्रत्येक दिवस हा नवा असतो. यावेळी आमचे खेळाडू नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करून भारताला पराभूत करतील असा विश्वास आहे, असे इंजमाम म्हणाला.
वर्ल्डकप स्पर्धेत आजवर पाकिस्तानला भारतीय संघावर मात करता आलेली नाही. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकने भारताला दोन वेळा पराभूत केले आहे. २००४ साली एजबस्टन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली होती. त्यानंतर २००९ मध्ये सेंच्युरिअन येथे पाकने भारतावर विजय प्राप्त केला होता. विशेष म्हणजे, यंदाही भारत-पाकिस्तान सामना एजबस्टन स्टेडियमवर होणार आहे.

Story img Loader