Champions Trophy Pakistan Venues Not Ready Yet: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ येत्या फेब्रुवारीमध्ये खेळवला जाणार आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद आहे. पाकिस्तानमध्ये कराची, लाहोर आणि रावळपिंडी या तिन्ही ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत. पण सध्याच्या घडीला पाकिस्तानातील हे स्टेडियम अजून तयार झाले नसल्याचे समोर आले आहे. महिन्याभरात सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी पाकिस्तान पूर्ण तयारीत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास एक महिना उरला आहे, परंतु पाकिस्तानमध्ये स्टेडियममधील स्थिती चिंताजनक आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे बांधकाम आणि अपग्रेडेशनचे काम अजूनही सुरू आहे आणि ही तिन्ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सोपवण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेले स्टेडियमचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते, परंतु ते पूर्ण होण्याच्या जवळपासही नाही.
आयसीसी हे चित्र पाहून चिंतेत आहे. ज्याप्रमाणे गेल्या वर्षी यूएसएमध्ये होत असलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान गोंधळाची स्थिती होती. त्याचप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीची पाकिस्तानातील स्थिती ही अगदी तशीच आहे. पाकिस्तानातील कामाकाजाचा आढावा घेणाऱ्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, “हे अतिशय निराशाजनक चित्र आहे. तिन्ही स्टेडियम अद्याप पूर्ण झालेली नाहीत आणि हे नूतनीकरण नाही तर स्टेडियमचं मूळ बांधकाम चालू आहे. आसनाच्या जागा, फ्लडलाइट्स, सुविधा आणि अगदी आऊटफिल्ड आणि खेळपट्टी सह खूप काम बाकी आहे.”
हेही वाचा – विराट कोहलीबरोबर धक्काबुक्कीनंतर मैदानाबाहेर भेटल्यावर नेमकी चर्चा झाली? कॉन्स्टासने स्वत: सांगितलं
आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास अवघे ४० दिवस उरले असून पाकिस्तानच्या तिन्ही स्टेडियममध्ये अद्याप बांधकाम सुरू आहे. पुढील आठवड्यात आयसीसीचे अधिकारी पाकिस्तानात जाऊन कराची, रावळपिंडी आणि लाहोरच्या स्टेडियमची पाहणी करतील, असे वृत्त आहे. दिलेल्या वेळेत स्टेडियम तयार करण्यासाठी पीसीबीला मुदत देण्यात आली आहे. जर पीसीबीने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही आणि आयसीसीच्या चेकलिस्टनुसार ठिकाणे तयार झाली नाहीत, तर संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमधून दुसऱ्या ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते. अशावेळी संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी यूएईमध्ये आयोजित केली जाईल.
गद्दाफी स्टेडियम अजून तयार झालेले नाही. याठिकाणी कोणतेही शेड बसवलेले नाहीत किंवा तेथे फ्लड लाइटही बसवलेले नाहीत. एवढेच नाही तर चाहत्यांसाठी आसनाची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. स्टेडियमच्या पूर्ण तयारीची अंतिम मुदत २५ जानेवारी असून या तारखेपर्यंत संपूर्ण काम क्वचितच पूर्ण होऊ शकते.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी घरच्या मैदानावर खेळावे यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीबरोबर मोठी चर्चा केली होती. पीसीबीची इच्छा होती की टीम इंडियाने स्पर्धा खेळण्यासाठी त्यांच्या देशात यावे, ज्याला बीसीसीआयने स्पष्टपणे नकार दिला. अखेर पीसीबीने हायब्रीड मॉडेलला सहमती दर्शवली आणि टीम इंडिया दुबईत आपले सामने खेळणार आहे.