दुबईमध्ये घरच्या मैदानावर खेळतायत असं वाटावं इतक्या लयीत सध्या भारतीय क्रिकेट संघ असला तरी न्यूझीलंंडच्या संघालाही काही गोष्टींचा फायदा होणार असून ते देखील दुबईत निवांत असू शकतात. आयपीएलमधील चेन्नईच्या संघातील अनेक खेळाडू न्यूझीलंडच्या संघात असून चेन्नईच्या चेपॉकची आठवण करून देईल असं वातावरण त्यांना दुबईत मिळणार आहे. रचिन रवींद्र, डेमन कॉनवे, डेरिल मिशेल, मिशेल सँटनर व मॅट हेन्री असे न्यूझीलंडच्या संघातील ५ खेळाडू चेन्नई सुपर किंग्जच्या संघात बराच काळ खेळले आहेत. ज्या प्रकारच्या पिचेसचा त्यांना अनुभव आहे तसंच पिच दुबईत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुबईत झालेल्या गेल्या चारही सामन्यांमध्ये अशीच संथ पिचेस बघायला मिळाली आहेत. जसा खेळ पुढे सरकतो तसे हे पिच अजून संथ होत जाते. फलंदाजांना बुचकळ्यात टाकतील इतपत फिरकी गोलंदाजांचे बॉल बऱ्यापैकी वळतात. पिचला बाउन्स किंवा उसळी कमी असते आणि विकेट कीपरकडेही बॉल पोटाच्या उंचीपर्यंत पोचतो, त्यावर सहसा उडत नाही.
या आधी श्रीलंकेतील, भारतातील कसोटी सामने, तिरंगी सामने व चॅम्पियन्स ट्रॉफी या सगळ्यासाठी रचिन रवींद्रनं सरावासाठी चेन्नईतील सीएसके अकादमीचीच निवड केली होती. त्या अनुभवाच्या आधारे त्याने या सगळ्या स्पर्धांमध्ये चांगलीच चमक दाखवली आहे. या टूर्नामेंटमध्येही रवींद्रने २२६ धावा फटकावल्या असून तो फलंदाजीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याआधी कॉनवेनेही चेन्नईमध्ये सराव केला असल्याचे सीएसके अकादमीचे मुख्य कोच श्रीराम कृष्णमूर्ती यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
कृष्णमूर्ती यांनी न्यूझीलंडच्या संघाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या संघाएवढं न्यूझीलंड संघाचं शेड्युल भरगच्च नसतं. पुढील सामन्यांसाठी सराव व प्रशिक्षणासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंना चांगली उसंत मिळते. नवीन पिचेसशी जुळवून घ्यायचं म्हणजे तशाच प्रकारच्या अन्य पिचवर, वातावरणात सराव करायचा, असं कृष्णमूर्ती म्हणाले. न्यूझीलंडच्या सीएसकेशी संबंधित खेळाडूंनी दुबईसदृश्य पिच व वातावरणात आधीच सराव केला असल्यामुळे त्यांना दुबईशी जुळवून घेण्यात विशेष कष्ट पडणार नाहीत असं जाणकारांचं म्हणणं आहे. आयपीएलचाही फायदा या खेळाडूंना झाला असून भारतीय उपखंडातल्या वातावरणाशी व पिचेसशी ते पटकन जुळवून घेऊ शकतात. श्रीराम कृष्णमूर्ती हे आधी न्यूझीलंडच्या स्थानिक पातळीवरील संघाचेही प्रशिक्षक होते.
त्यामुळे, रवींद्र, कॉनवे व मिशेलसारखे खेळाडू वातावरण व पिचेस बदलल्यावर नवीन काहीतरी मार्ग काढण्याऐवजी चटकन तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. अन्य देशांचे अनेक फलंदाज भारतीय फिरकीपटूंना खेळताना स्विपचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पण न्यूझीलंडचे फलंदाज पायांचा वापर करतात, पुढे जाऊन खेळतात, विकेटच्या दोन्ही बाजूंना परिस्थितीप्रमाणे फटके मारतात आणि असं दिसतं की ते अटॅक व डिफेन्स या दोघांचं मिश्रण करत यशस्वीरीत्या खेळू शकतात. गेल्या रविवारीही त्यांचा हाच प्रयत्न होता, परंतु वरूण चक्रवर्तीच्या जादूपुढे त्यांचं काही चाललं नाही.
कॉनवे हा फिरकी उत्कृष्टरीत्या खेळतो. चेन्नईमध्ये प्रशिक्षण घेतलेला रवींद्र बॅकफूटला चांगला खेळतो याचा धीम्या गतीच्या व चेंडू वळायला मदत करणाऱ्या पिचवर फायदा होतो. तसंच वेळप्रसंगी पुढे जात आक्रमण करण्यासाठी पायांचा वापर करण्याचे कौशल्यही तो शिकला आहे. नेहमीसारखा स्विप न मारता स्लॉग करून विकेट कीपरच्या डोक्यावरून मारायचा स्विपचा फटकाही त्याने आत्मसात केलाय.
मिशेल स्विपबरोबरच रिव्हर्स स्विपचाही प्रभावी वापर करतो. तसेच सरळ चाल करत जात समोर गोलंदाजांच्या डोक्यावरूनही फटका मारतो. न्यूझीलंडमध्ये फिरकीपटूंना कसं खेळावं लागतं यामध्ये आणि इथे खूप फरक आहे. आणि चेन्नई व दुबईची परिस्थिती खूप सारखी असल्यामुळे या अनुभवाचा त्यांना फायदा मिळणार आहे. न्यूझीलंडचे फलंदाज स्मार्ट असून एका प्रकारच्या बॉलला एकाच प्रकारचा फटका न मारता क्षेत्ररक्षण कसं आहे यानुसार वेगवेगळे फटके मारण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केल्याचे निरीक्षण श्रीराम नोंदवतात.
श्रीराम यांनी न्यूझीलंडमधील अनुभव सांगताना नमूद केले की न्यूझीलंडचे खेळाडू निवांत वेळ असल्याने मधल्या काळात वेळ पडली तर इनडोअर ट्रेनिंग घेतात व स्पिन खेळण्याचे कौशल्य वाढवतात. विदेशात दौऱ्यावर जाण्याआधी न्यूझीलंडमध्ये शिबिरं घेतली जातात व वेगवेगळ्या प्रकारची पिचेस क्युरेटर्सना बनवायला सांगून त्यावर सराव केला जातो. त्यामुळे कोरडी पिचेस, चेंडूला उसळी देणारी पिचेस, चेंडू वळवणारी पिचेस अशा आवश्यक त्या पिचेसचा सराव ते घरून निघतानाच करतात. ते नेहमी तयारीनिशीच येतात यावर श्रीराम यांनी जोर दिला.
न्यूझीलंडचा कप्तान व फिरकीपटू सँटनर २०१८ पासून आयपीएलमध्ये आहे. आणि विशेषत: तो रवींद्र जाडेजाचा बारकाईनं अभ्यास करतो. पाच मोसमांमध्ये तो केवळ १८ सामने खेळलाय परंतु न्यूझीलंडला परत जाताना त्यानं अभ्यासपूर्ण अवलोकनातून महत्त्वाची माहिती गोळा केलेली असते. यामध्ये चेंडूच्या वेगामध्ये बदल हे प्रमुख अस्त्र त्याच्या लक्षात आलंय. टेम्बा व दुसेंन या अफ्रिकेच्या फलंदाजांना बाद करताना वेगातला बदल त्यानं कौशल्याने केला हे लक्षात येईल. हा एकप्रकारे चेन्नई व आयपीएलचाच झालेला फायदा म्हणायला हवा.
जाडेजा व सँटनर एकाचप्रकारचे गोलंदाज असल्याने व एकाच सीएसके संघातून खेळले असल्यामुळे या अनुभवाचा सँटनरने लाभ उठवला नसेल तरच नवल. पूर्वी सँटनर हा जास्त गतीनं चेंडू टाकणारा फिरकीपटू म्हणून ओळखला जायचा. चेंडू वळवणं ही त्याची ओळख नव्हती, परंतु आता तुम्ही बघाल तर सँटनर वेगात बदल करतो, चेंडू वळवतो आणि असल्या संथ पिचेसवर आधीपेक्षा जास्त धोकादायक झाला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या संघाला चेन्नई सीएसकेमुळे झालेला फायदा बघता भारताला सर्वोच्च दर्जाचा खेळ करावा लागेल यात काही संशय नाही. चेन्नई सुपरकिंग्जच्या माध्यमातून दुबईतील परिस्थितीशी चांगला परिचय असलेल्या न्यूझीलंड संघाला कमी लेखून चालणार नाही.