Champions Trophy 2025 Sanju Samson drop in Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीसारखे खेळाडू संघात परतले आहेत. मात्र, संजू सॅमसनला या संघातून वगळण्यात आले आहे, ज्याने जवळपास ५७च्या सरासरीने दमदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे मागील पाच सामन्यात त्याने तीन शतकं झळकावली होती.
काही दिवसांपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात चर्चेत असलेल्या खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसनच्या नावाचाही समावेश होता, मात्र दुर्दैवाने त्याला संघात स्थान मिळाले नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे त्याला शिक्षा झाल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये केला जात आहे. आणखी एक पैलू म्हणजे ऋषभ पंत संघाचा मुख्य यष्टिरक्षक आणि केएल राहुलला बॅकअप खेळाडू म्हणून संधी मिळाल्याने संजूवर अन्याय झाल्याची चर्चा आहे.
संजू सॅमसनने आतापर्यंत खेळलेल्या १६ एकदिवसीय सामन्यांच्या १४ डावांमध्ये ५६.६६ च्या सरासरीने आणि ९९.६० च्या स्ट्राईक रेटने ५१० धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेत भारतासाठी शतक झळकावले होते. विशेष म्हणजे त्याने टीम इंडियासाठी मागील ५ टी-२० सामन्यात ३ शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : मोहम्मद सिराजला टीम इंडियातून डच्चू! रोहित शर्माने सांगितलं निवड न होण्यामागचं कारण
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.