Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी अनेक संघानी आपला चमू जाहीर केला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख ही १२ जानेवारी होती. मात्र भारतीय संघाने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसहित अनेकांनी आपले संघ जाहीर केले. मात्र भारतीय संघाने आयसीसीकडे वेळ मागून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वच भारचीतीय चाहत्यांच्या नजरा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया कशी असेल यावर आहेत. मात्र भारतीय संघाच्या चाहत्यांना आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या स्पर्धेसाठी संघ कधी जाहीर करणार याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून माहिती समोर आली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी (१२ जानेवारी) सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ १८ किंवा १९ जानेवारीला जाहीर केला जाईल. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शनिवारी (११ जानेवारी) इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठी १२ जानेवारी ही अंतिम मुदत ठेवली होती. भारतीय संघाने आयसीसीकडे मुदतवाढ मागितल्याची बातमी यापूर्वी आली होती. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा मुद्दा टीम इंडियासमोर आहे.
हेही वाचा – कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
जसप्रीत बुमराहची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचे कारण आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५व्या कसोटी सामन्यात त्याला पाठीचा त्रास झाला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करता आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट सामन्यांपर्यंत बुमराह मैदानापासून दूर राहू शकतो, अशी बातमी आहे. मात्र, भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी म्हणजे मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला आहे. त्याची इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवड झाली आहे. २०२३ च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या शमीची वर्ल्डकपनंतर थेट इंग्लंडविरूद्ध टी-२० सामन्यात निवड झाली आहे. शमीवर या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली जागा निश्चित करावी लागणार आहे. याशिवाय शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनेक सामने खेळले आहेत.
हेही वाचा – IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ८ संघ एकमेकांविरूद्ध भिडणार आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ ३ संघांनी आपले संघ जाहीर केलेले नाहीत, ज्यात भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेष आहे. १०१३ एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाने १३ जानेवारीला म्हणजेच आज संघ जाहीर केला आहे, ज्यात संघाचे नेतृत्त्व पॅट कमिन्स करणार आहे तर इंग्लंडने सर्वप्रथम संघाची घोषणा केली. यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेशने १२ जानेवारीला संघांची घोषणा केली.