दुबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात फिरकीपटूंवर विशेष लक्ष असणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाकडे २०२३ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. मात्र, भारतासाठी आव्हान इतकेही सोपे नसेल.
पॅट कमिन्स, जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क यांच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियन संघ मजबूत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध ३५२ धावांचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला होता. भारताला ‘आयसीसी’ स्पर्धांच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा विजय २०११ च्या विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात मिळाला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने २०१५ एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि २०२३ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला नमवले होते. याशिवाय २०२३ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी भारतीय संघ सलग तीन विजयांसह चांगल्या लयीत असून त्यांना ऑस्ट्रेलियाला नमविण्याची चांगली संधी आहे.
झॅम्पा, मॅक्सवेल, हेडकडून अपेक्षा
ऑस्ट्रेलियाकडे एकमेव फिरकीपटू अॅडम झॅम्पा आहे. मात्र, त्यांना ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांकडून चांगली कामगिरीची अपेक्षा असेल. मॅथ्यू शॉर्ट दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्याच्या जागी कूपर कोनोलीला स्थान मिळाले आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघांविरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अनुक्रमे ३५२ व २७३ धावा दिल्या. आता त्यांच्यासमोर विराट, रोहित व श्रेयससारख्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल. ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये हेड भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संघाला त्याच्याकडून आक्रमक खेळी अपेक्षित असेल. कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणाऱ्या स्मिथवर संघासाठी धावा करण्याची मोठी जबाबदारी असेल. मार्नस लबूशेन व जोस इंग्लिस यांच्याकडेही विशेष लक्ष असेल.
● वेळ : दुपारी २.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.
वरुण, अक्षरवर मदार
स्पर्धेपूर्वी संघात पाच फिरकीपटूंचा समावेश केल्याने व्यवस्थापनाला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, दुबई येथील धिम्या खेळपट्टीवर आता हाच निर्णय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सर्व सामने दुबईत खेळत असल्याने त्याचा फायदा भारताला मिळत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, भारताने आपल्या कामगिरीत सामन्यागणिक सुधारणा केली आहे. फिरकीपटूंचा चेंडू फार वळत नसला, तरीही भारतीय गोलंदाजांचा संयम या खेळपट्टीवर त्यांच्या कामी आला. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांनी नऊ गडी बाद केले. त्यांनी ३९ षटकांत १२८ चेंडू निर्धाव टाकले. केन विल्यम्सनसारख्या फलंदाजालाही अक्षरविरुद्ध खेळताना संयम राखता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची मदार याच फिरकीपटूंवर असेल. मात्र, याकरिता फलंदाजांनाही खेळात संयम दाखवावा लागेल. विराट कोहली, रोहित शर्मा व शुभमन गिल यांनाही गेल्या सामन्यातील चुकांवर मेहनत घ्यावी लागेल.